माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांच्याकडून औषधे, मास्क, ऑक्सिमीटरचे वितरण
प्रतिनिधी / खानापूर
कोरोना महामारी केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात पसरली आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी खानापूर येथे कोरोना रुग्णांसाठी औषधे, मास्क, ऑक्सिमीटर आदींचे वितरण करताना व्यक्त केले.
यावेळी ते म्हणाले, प्रत्येकाने कोरोनासंदर्भात काळजी घ्यावी. प्रशासनाने या संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनातील विविध खात्यांचे अधिकारी, डॉक्टर्स, पोलीस, आशा कार्यकर्त्या, नर्स, अंगणवाडी कार्यकर्त्या, नगरपंचायतीचे कर्मचारी आदी प्रंटलाईन वर्कर्सचे काम प्रशंसनीय म्हणावे लागेल. कोरोनासंदर्भात सध्या लसीकरण मोहीम सुरू आहे. प्रत्येकाने लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. सध्या राज्यात लसी कमी प्रमाणात उपलब्ध असल्या तरी पुढील महिन्यापासून त्यामध्ये बरीच वाढ होणार आहे. प्रत्येकाने लसीकरण करून घेतल्यास निश्चितपणे कोरोना त्यांच्यापासून दूर राहील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रारंभी तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांनी कोरोना महामारी रोखण्यासाठी तालुक्यात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी बोलताना प्रशांत देशपांडे म्हणाले, आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार खानापूर तालुक्यात एकूण 725 सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 18 जणांवर खानापूरच्या सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. काँग्रेस स्ट्रेस्टींगच्या सूचनेनुसार आतापर्यंत उत्तर कर्नाटकातील 12 तालुक्यात औषधांचे किट्स, मास्क, ऑक्सिमीटरचे वितरण करण्यात आले आहे. त्यानुसार खानापूर तालुक्यासाठी कोरोना रुग्णांना आवश्यक असलेल्या औwषधांचे 830 किट्स, 200 ऑक्सिमीटर व 1000 मास्क तालुका प्रशासनाला सुपूर्द केले आहेत. प्रत्येकाने कोरोना महामारीच्या काळात आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. मास्क लावूनच फिरावे, सामाजिक अंतर राखावे, असे आवाहन केले. यावेळी तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजय नांदे, नगराध्यक्ष मझहर खानापुरी, नगरसेवक मेघा कुंदरगी, विनायक कलाल, विनोद पाटील, नारायण हुंदरे, प्रकाश बैलूरकर, हणमंत नाईक, ग्रामीण अध्यक्ष मधु कोळेकर, खानापूर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी, तालुका महिला अध्यक्ष अनिता दंडगल, गुरुसाब टेकडी यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.