ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोना लस निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल भारताला पुरविण्यास अमेरिकेने होकार दिला आहे. त्यामुळे भारतात आता लसीकरणाला गती मिळणार आहे.
कोरोना लस तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल देशाबाहेर न पाठवण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला होता. मात्र, भारताला लस निर्मितीसाठी कच्च्या मालाची आवश्यकता होती. त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दोन वेळा अमेरिकेकडे लस निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल पाठवण्याची विनंती केली होती. मात्र अमेरिकेने त्याला प्रतिसाद दिला नव्हता. अखेर भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार प्रमुख अजित डोभाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार प्रमुख जॅके सुलीवॉन यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर अमेरिकेने कोरोना लढ्यात भारताला साथ देण्याची तयारी दर्शवली.
भारताला पीपीई किट, रॅपिड टेस्टिंग कीट, ऑक्सिजन जनेरशन संदर्भात मदत करण्याची तयारी अमेरिकेने दर्शवली आहे. अमेरिकेच्या आरोग्य खात्याच्या तज्ज्ञांचे पथकही भारतात येणार असून, ते भारतातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयासोबत काम करणार आहे. तसेच अमेरिकेची डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आगामी काळात भारताला 2022 च्या अखेरपर्यंत 100 कोटी कोरोना डोस तयार करता येतील, एवढ्या कच्च्या मालाच्या उत्पादनासाठी मदत करणार आहे.