आपत्कालीन वापरासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या लसीचा आपत्कालीन वापर करण्यास सिरम इन्स्टिटय़ूट आणि भारत बायोटेक यांना परवानगी देण्यास औषध नियमकांनी नकार दिला आहे. लसीच्या सुरक्षा आणि परिणामकारकतेबद्दल अधिक माहिती देण्याच्या सूचना दोन्ही लस उत्पादकांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, शासकीय पातळीवर अशा प्रकारचे निर्णय घेणयासाठी अनेक बैठका होत असतात. ही प्रक्रिया पूर्ण होऊन एक-दोन आठवडय़ात लसीच्या वापराला परवानगी मिळू शकेल, असा विश्वास ‘सिरम’च्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.
सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या विशेषज्ञ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. कोरोना महासाथीच्या काळात या लसीचा आपत्कालीन वापर करण्याची परवानगी सिरम, फायझर आणि भारत बायोटेक यांनी मागितली होती. या लसींना परवानगी देण्यासाठी पुरेशी माहिती देण्यात आली नाही, असे कारण देण्यात आले. लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता याची सविस्तर माहिती देण्याची मागणी नियमकांनी केली आहे.
‘कोरोना लसी’च्या परिणामकारकतेच्या दाव्याला बळकटी देणाऱया तपशिलाची गरज असल्याचे मत समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे. मात्र तिन्ही कंपन्यांनी हा तपशील सादर केलेला नाही. फायझर कंपनीची लस वेगळी म्हणजे ‘एमआरएनए’ पद्धतीची आहे. त्यावर अभिप्राय देऊ शकणारे तज्ञ बैठकीस उपस्थित नव्हते. त्यामुळे फायझरच्या लसीबाबत निर्णय झाला नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना लस उपलब्ध होण्यास विलंब लागण्याची शक्मयता आहे.