वार्ताहर / काकती
कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी काकतीत कोविड-19 लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे.राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट पसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली. यानुसार जिल्हय़ातील ग्रामीण भागातही लसीकरणाला सुरुवात झाली आहे. काकती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने मारुती गल्ली येथील मराठी शाळेत ग्रा. पं. उपाध्यक्षा वर्षा मुचंडीकर यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येत असलेल्या खबरदारीचे पालन आरोग्याच्या दृष्टीने करावे. मास्क घालून व सामाजिक अंतर ठेवून वावरावे, असे आवाहन ग्रा. पं. उपाध्यक्षा मुचंडीकर यांनी केले.
वंटमुरी कम्युनिटी आरोग्य केंद्राचे डॉ. मनियरम, परिचारिका लक्ष्मी प्रकाश अंबी, सुनंदा एम. कोरी यांनी लसीकरण संबंधीत नियमावली व खबरदारीचे मार्गदर्शन केले.
या कोविड लसीकरणासाठी प्रथम ज्येष्ठ नागरिक व 40 वर्षांपुढील उच्च रक्तदाब, मधुमेह व इतर रुग्णांना या पहिल्या टप्प्यात अग्रक्रम देण्यात आला आहे. लसीकरण करून घेण्यासाठी येताना सोबत आधारकार्ड घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले.
या विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व्हसा वंटमुरी, होनगा, मुत्तेनट्टी आदी ठिकाणी लसीकरण करण्यात येत असून नागरिक व महिलांनी आरोग्याच्या सुरक्षितेसाठी लाभ घ्यावा, असे मार्गदर्शन केले.