नियमांचे उल्लंघन : कोरोना पुन्हा वाढण्याची शक्यता
प्रतिनिधी /बेळगाव
नियंत्रणात येत असलेला कोरोना लसीकरणाच्या गर्दीमुळे पुन्हा वाढणार नाही ना? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनावर लस आल्यानंतर प्रारंभी नागरिकांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. परंतु, बाधितांचा आकडा वाढू लागताच लसीकरणाचे महत्त्व प्रत्येकालाच पटले. त्यातच 18 वर्षांवरील सर्वांनी लस घेणे आवश्यक आहे, असे सरकारने स्पष्ट केल्याने ही संख्या वाढली.
तथापि, आरोग्य केंद्रांवर लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची गर्दी चिंताजनक ठरत आहे. मुख्य म्हणजे या ठिकाणी सामाजिक अंतराच्या नियमाचा पूर्ण विसर पडलेला दिसून येत आहे. लसीची उपलब्धता आणि लसीकरणासाठी आलेल्यांची संख्या यामध्ये प्रचंड तफावत आहे. प्रत्येकाला आपल्याला आधी लस मिळावी, असे वाटत असल्याने तेथे ना रांग लावली जाते ना शिस्त पाळली जाते. त्यातच गर्दी वाढल्यानंतर उष्म्यात वाढ झाल्याने तोंडावरील मास्कही बाजूला केला जात आहे. एकूणच लसीकरण केंद्रांवर कोविड-19 नियमांचे उल्लंघन होत आहे. आरोग्य केंद्रातील कर्मचारी वारंवार या नियमांबाबत सूचना देत असतात. परंतु, कोणीही सूचनांकडे लक्षच देत नाहीत. गर्दी अशीच वाढत राहिली तर नियंत्रणात येत असलेला कोरोना पुन्हा डोकेवर काढण्याची शक्मयता नाकारता येत नाही.