कणकवली, कासार्डे, देवगड येथे लसीकरणाची रंगीत तालीम : जिल्हाधिकाऱयांकडून पाहणी
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
बहुप्रतिक्षित कोरोनाची लस लवकरच उपलब्ध होणार आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर ती नागरिकांना कशा प्रकारे देण्यात येणार, याबाबतचे ‘ड्राय रन’ अर्थात रंगीत तालीम शुक्रवारी जिल्हय़ात झाली. कणकवली उपजिल्हा रुग्णालय, कासार्डे प्राथमिक आरोग्य पेंद्र व देवगड ग्रामीण रुग्णालय या तीन ठिकाणी 75 जणांची कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे भेट देऊन पाहणी केली. कोणत्याही उणिवा राहता नये, याबाबत आरोग्य यंत्रणेला सूचना देत लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, कणकवली तहसीलदार रमेश पवार, आरसीएच अधिकारी डॉ. संदेश कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, आयडीएसपीचे डॉ. प्रशांत सवदी, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक, डॉक्टर व कर्मचारी यांच्या उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालयामध्ये ‘ड्राय रन’ची सुरुवात करण्यात आली. कणकवली येथे 25 लोकांना लस देण्याची तालीम घेण्यात आली.
लसीकरणाचे एकूण तीन टप्पे असून पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. दुसऱया टप्प्यात प्रशासकीय अधिकारी आणि तिसऱया टप्प्यात सर्व नागरिकांना लस देण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना लस देताना इतर आजार आणि 50 पेक्षा जास्त वय असणाऱयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या सर्व लसीकरणाचे नियोजन कसे असणार आहे, याचे पूर्व प्रात्यक्षिक शुक्रवारी घेण्यात आले.
या ‘ड्राय रन’मध्ये तिन्ही ठिकाणी प्रत्येक सत्रासाठी 25 या प्रमाणे एकूण 75 लाभार्थींची निवड करण्यात आली होती. या लसीकरणासाठी आवश्यक लाभार्थी नोंदणी कोविन पोर्टलवर आरोग्य विभागाकडून यापूर्वीच करण्यात आली आहे. त्यातूनच 75 लाभार्थींची निवड करण्यात आली होती. या ड्राय रनमध्ये प्रथम कक्ष, नोंदणी कक्ष, प्रतीक्षा कक्ष, त्यानंतर लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष अशा तीन खोल्यांची व्यवस्था करण्यात आली होती. लसीकरणाच्या ठिकाणी येणाऱया लाभार्थींना प्रथम लसीकरणासाठी येण्यासाठी त्यांच्या नोंदीकृत मोबाईलवर विशि÷ वेळेत येण्याविषयी संदेश पाठविण्यात आला होता. त्याप्रमाणे लाभार्थी लसीकरणासाठी आल्यानंतर त्यांचे थर्मल स्क्रिनिंग, पल्स ऑक्सीमीटरद्वारे तपासणी करून त्यांची नोंद व्हॅक्सीन देण्यासाठी पोर्टलवर करण्यात आली असल्याची खात्री करण्यात आली. ओळख पटविण्यासाठी लाभार्थीजवळ फोटो ओळख पत्र जसे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, बँक पासबूक, मनरेगाचे जॉबकार्ड यापैकी एक असणे आवश्यक आहे. हे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीला लस देण्याबाबतची कार्यवाही करून त्यांना पुढील अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. अशा प्रकारे कोविड लसीकरणाची पूर्ण प्रक्रिया करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकाऱयांनी लसीच्या साठवणुकीची क्षमता, रुग्णांना निरीक्षणाखाली ठेवण्यासाठीची व्यवस्था तसेच लस देण्यापूर्वी व दिल्यानंतर लोकांची कशा प्रकारे देखरेख ठेवली जाणार आहे, या सर्व गोष्टींचा सविस्तर आढावा घेतला. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता ही लस टोचून घ्यावी व स्वतःसह स्वतःच्या कुटुंबास व एकूणच समाजास सुरक्षित ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले. यावेळी कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कासार्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी भेट देऊन प्रक्रियेची पाहणी केली. केंद्रामध्ये कशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे आणि भविष्यात त्यामध्ये कोणत्या गोष्टींची सुधारणा करावी लागेल, याविषयी त्यांनी उपस्थित अधिकाऱयांशी चर्चा केली.