ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनावरील लसीची किंमत कमी करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, खासगी रुग्णालयात मिळणाऱ्या लसीची किंमत 200 रुपयांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली.
राजेश भूषण म्हणाले, भारताने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली. त्यानंतर 16 जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयातही ही लस उपलब्ध करण्यात आली असून, त्यासाठी सध्या 250 रुपये शुल्क आकारले जाते. सरकार सर्व करांसह 210 रुपयात ही लस खरेदी करत होते.
सरकार आता सीरमकडून कोविशिल्ड लस कमी दरात खरेदी करणार आहे. सर्व कर वगळता या लसीची किंमत 150 रुपयांपेक्षा कमी असेल. त्यामुळे नागरिकांना खासगी रुग्णालयात ही लस 200 रुपयांपेक्षा कमी दरात मिळू शकेल,असेही भूषण यांनी सांगितले.