वार्ताहर/ माशेल
कोरोनाच्या झपाटय़ाने वाढत असलेल्या संसर्गातही कोरोनाविषयक सर्व नियम धाब्यावर बसवून माशेल बाजारात नागरिक वावरत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गेले कित्येक दिवस माशेलमध्ये ही गर्दी पाहायला मिळते. विनामास्क आणि सामाजिक अंतर न राखता माशेल येथील बाजरात गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्य़ाची शक्यता बळावली आहे.
कोरोनाच्या संशयितांची बेतकी आरोग्य केंद्रात चाचणी व तपासणीसाठी लक्षणीय वाढ होत आहे. त्यातच कोरानाबाधित लोकही बाजारात फिरत असताना दिसत असल्याने काहीजणांचे म्हणणे आहे. माशेल हे मध्यावर्ती बाजारहटीचे ठिकाण असल्याने नावेली, आमोणा, टोंक, जुवे, कुंभारजुवे, बेतकी खांडोळा अशा सर्व गावातून लोक बाजारहटीसाठी येत आहेत. बागायतदार सोसायटीत लोक गर्दी करतात. मासळी मार्केटात सकाळी सहा वाजल्यापासून सुरू झालेली गर्दी दुपारपर्यंत असते. त्यामुळे सरकारने दिलेल्या नियमांचा भंग होत असल्याचे मत काही सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे. नियमभंग करणारे स्वतःच्या जीवाबरोबर इतरांच्या जीवाशी लोक खेळत आहे. सरकारने जीवनाश्यक वस्तूसाठी सकाळी 7 ते दुपारी 1 वा.पर्यत वेळी दिला आहे. तरी लोकांनी घाई करण्याचे कारण काय असा सवाल उपस्थित केल्यास काहीजणांकडून खडे बोलही सुनावले जातात त्यामुळे या परिस्थितीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
फोंडय़ाचे पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांनी आपल्या फौजफाटय़ासह इथे येऊन कारवाई करावी तसेच सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यत पोलीस कर्मचारी कार्यरत ठेवावे अशी मागणी संतत्प नागरिकांनी काळजीपोटी केली आहे.