वार्ताहर/ रामदुर्ग
कोरोना नियंत्रणासाठी गत 4 महिन्यापासून आरोग्य खात्याचे कर्मचारी, अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या, पोलीस खाते व महसूल खात्याचे कर्मचारी सेवा बजावत आहेत. मात्र, कोरोना दिवसेंदिवस वाढू लागल्याने अजूनही जागृत होणे आवश्यक आहे, असे मत आमदार महादेवप्पा यादवाड यांनी व्यक्त केले. येथील ता. पं. सभाभवनामध्ये सोमवारी झालेल्या कोविड-19 टास्कफोर्स समितीने आयोजिलेल्या अधिकाऱयांच्या सभेत ते बोलत होत.
आमदार यादवाड पुढे म्हणाले, दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करीत खबरदारी घ्यावी. तसेच कोरोनाविषयी नागरिकांत जागृती करणे गरजेचे आहे. तालुक्यामधील खासगी दवाखान्याची मदत घ्यावी, होसकोटी व रामदुर्ग येथील सरकारी समुदाय दवाखान्यामध्ये कोविड बेडची व्यवस्था करावी, शहरासह सर्व ग्रामीण भागात जंतूनाशक औषधाची फवारणी करावी, अशी सूचना नगरपरिषद आणि ग्रामपंचायत प्रशासनाधिकाऱयांना केली. तर होम क्वारंटाईनचे उल्लंघन करणाऱयांवर कायदेशीर कारवाई करावी, असे पोलीस अधिकाऱयांना आवाहन केले. तालुक्यात यापूर्वी केवळ दोनच प्रकरण आढळून आले होते. मात्र, जुलैमध्ये सहा जणांना बाधा झाली आहे. आतापर्यंत 1768 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून यात 500 निगेटीव्ह आले असून रोगाबद्दल भीती नको. आरोग्य खात्याने दिलेल्या सूचनांचे पालन व्हावे, असे त्यांनी सांगितले.
रामदुर्ग शासकीय दवाखान्यात 30 कोविड बेडची व्यवस्था केली असून तालुक्यातून येणाऱया कोविड रुग्णांना येथेच उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती टीएचओ डॉ. महेश चितरगी यांनी दिली. दरम्यान, बोलताना डीवायएसपी शंकर गौडा पाटील यांनी, शहरामध्ये होम क्वारंटाईन करण्यात आलेल्यांवर नगर परिषदेने निगा ठेवावी. ग्रामीण भागात पंचायत प्रशासनाधिकाऱयांनी निगा राखावी, होम क्वारंटाईनमधून बाहेर फिरत असल्यास आपल्या नजरेस आणावे, असे त्यांनी सांगितले.
तहसीलदार गिरीश स्वादी यांनी, तालुक्यात कोरोना प्रकरण वाढ लागल्याने मंगळवारी सर्व व्यापारदारांची सभा आयोजिले असून लॉकडाऊनबद्दल चर्चा करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी ता. पं. इओ मुरलीधर देशपांडेसह आरोग्य खात्याचे डॉक्टर्स व ग्रा. पं. प्रशासनाधिकारी उपस्थित होते.