कृष्णात पुरेकर/कोल्हापूर
कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत डॉक्टर, परिचारिकांना केंद्राने विमा संरक्षण दिले आहे, पण तरीही त्यामध्ये संभ्रमावस्था होती. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या पत्रात मात्र ‘आरोग्य कर्मचारी’ असा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यामुळे राज्यात कोरोना प्रतिबंधात कार्यरत असलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱयांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत डॉक्टर, परिचारीकांसह अन्य स्टाफ तणावाखाली आहे. कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांवर उपचार करणाऱया वैद्यकीय स्टाफला पर्सनल प्रोटेक्शन कीट आहेत. तरीही काही डॉक्टरांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. त्यामुळे या वैद्यकीय स्टाफसाठी केंद्र शासनाने 50 लाखांच्या मदतीची घोषणा केली होती. पण ही मदत, विमा संरक्षण कोणाला? याबाबत राज्यातील कंत्राटी डॉक्टर, अन्य स्टाफमध्ये संभ्रम होता, त्यामुळे त्यांच्यात भीतीसह नाराजीही होती.
केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव वंदना गुरनानी यांनी यासंदर्भात राज्याच्या सचिवांना शुक्रवारी पत्र पाठवले आहे. या पत्रात राष्ट्रीय आरोग्य मिशन टप्पा 2 चा संदर्भ देण्यात आला आहे. पत्रात ‘कोरोना साथीच्या विरोधात सक्रीय असलेल्या आरोग्य कर्मचाऱयांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा संरक्षण दिले आहे. यामध्ये कर्तव्य करताना मृत्यू आल्यास, ‘कोरोना’शी निगडीत अपघाती मृत्यू झाल्यास वैयक्तिक अपघात विम्यांतर्गत विमा संरक्षण दिले आहे. त्यासाठी दोन फॉर्म देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
जिल्हय़ात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत 600 आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. सीपीआर हॉस्पिटलमध्ये सुमारे 100 आरोग्य कर्मचारी आहेत. यामध्ये डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदींचा समावेश आहे. यातील काही जण 2002 पासून कार्यरत आहेत. 2013 च्या आदेशान्वये त्यांना वेतन मिळत असले तरी अन्य लाभांपासून ते वंचित आहेत. त्यामुळे कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली, तेव्हा या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱयांना सतर्क करण्यात आले. पण कायमस्वरूपी असलेल्या वैद्यकीय स्टाफला असलेल्या विमा संरक्षण कवचात कंत्राटी कर्मचारी आहेत का, याबाबत संभ्रम असल्याने त्यांच्यात भीतीसह नाराजीही होती.
केंद्रीय आरोग्य, कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या सचिव वंदना गुरनानी यांच्या पत्राने मात्र कोरोना प्रतिबंधासाठी लढणाऱया सर्वच आरोग्य कर्मचाऱयांना सामावून घेतले आहे. यासंदर्भातील फॉर्मचे नमुनेही पाठवले आहेत. ‘कोरोना’ प्रादुर्भाव अन् असलेली जोखीम पाहता रूग्णांना तपासणारे डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉयही तणावाखाली काम करत आहेत. त्यांना कुटुंब आणि नोकरी दोन्ही स्तरावर दक्षता घ्यावी लागत आहे. यात सहभागी कंत्राटी वैद्यकीय स्टाफलाही विमा संरक्षण मिळाल्याने दिलासा मिळाला आहे, असे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील कागले यांनी सांगितले.