कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार शोधण्याचे प्रयत्न जगातील अनेक देशांमध्ये सुरू आहेत. भारतातही अनेक कंपन्या याच्या संभाव्य औषधांसंबंधी चाचण्या करत आहेत. यातील काही औषधांच्या क्लीनिकल ट्रायल्सना मंजुरी देखील मिळाली आहे. अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये 2-3 औषधांवर युद्धपातळीवर काम सुरू आहे. ही औषधेच कोरोना विरोधातील युद्ध जिंकण्यासाठी आम्हाला आशेचा किरण दाखविणारी आहेत. या औषधांच्या चाचण्यांचे प्रारंभिक निष्कर्ष अत्यंत सकारात्मक आहेत. काही औषधांची मात्रा कोरोनाबाधितांना देण्यात आल्यावर त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा दिसून आली आहे.
रेमडेसिविर
कोरोना विरोधी लढाईत आतापर्यंतचे सर्वात प्रभावी औषध रेमडेसिविर असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेत याच्या तिसऱया टप्प्यातील चाचणीत सकारात्मक परिणाम प्राप्त झाले आहेत. ‘रेमडेसिविर’ औषधाच्या 5 दिवसांच्या डोसनंतर 50 टक्के कोरोनाबाधितांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली आहे. यातील निम्म्यापेक्षा अधिक जणांना दोन आठवडय़ांच्या आतच डिस्चार्ज मिळाल्याची माहिती गिलिड सायन्सेस या कॅलिफोर्नियातील औषध कंपनीने दिली आहे. तिसऱया टप्प्यातील चाचणीनंतरच औषधाच्या वापराला अनुमती मिळते. रेमडेसिविर औषधाला अद्याप जगात कुठलीच मंजुरी तसेच परवाना मिळालेला नाही. हे औषध इबोलाच्या उपचारासाठी विकसित करण्यात आले होते. विषाणूला शरीरात स्वतःचा क्लोन तयार करण्यापासून रोखण्याच्या दृष्टीने हे औषध तयार करण्यात आले आहे.
फॅविपिराविरच्या चाचणीला मंजुरी
ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सला कोरोनाबाधितांवर फॅविपिराविर टॅबेलेट्सची चाचणी करण्याची अनुमती मिळाली आहे. या औषधाचा कच्चा माल कंपनीने स्वतःचा तयार केला आहे याचबरोबर औषधाचे फॉर्म्युलेशन देखील कंपनीनेच विकसित केले आहे. फॅविपिराविर एक अँटी-व्हायरल औषध आहे. इन्फ्लुएंजा विषाणूच्या विरोधात हे औषध उपयुक्त ठरले आहे. जपानमध्ये इन्फ्लुएंजा विषाणूच्या उपचारासाठी या औषधाच्या वापराची अनुमती आहे. मागील काही महिन्यांमध्ये चीन, जपान आणि अमेरिकेत कोरोनाबाधितांवर अशाप्रकारच्या अनेक प्रायोगिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. या औषधाच्या वापराला चीनमध्ये मंजुरी मिळाली आहे.
बीसीजीची क्लीनिकल ट्रायल
टय़ूबरक्यूलोसिसचे औषध बीसीजीचा वापर करत कोरोनावर उपचाराची शक्यता पडताळून पाहिली जात आहे. अमेरिकेच्या हॉपकिन रिसर्च इन्स्टीटय़ूटचे वैज्ञानिक महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण विभागासोबत मिळून क्लीनिकल ट्रायलची तयारी करत आहेत. प्रारंभिक चाचण्यांमध्ये बीसीजी कॉन्सेप्टचे परिणाम सकारात्मक आल्याने त्याच्या चाचणीच्या दिशेने पावले टाकली जात आहेत.
गिमसिलुम्बची अमेरिकेत चाचणी
अमेरिकेच्या टेंपल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलने मोनोक्लोनकल अँटीबॉडी गिमसिलुम्बची चाचणी रुग्णांवर सुरू केली आहे. कोविड-19 मुळे फुफ्फुसांवर परिणाम करणाऱया घटकांनाच हे औषध लक्ष्य करते. या औषधाची दोनवेळा क्लीनिकल चाचणी झाली आहे. हे औषध सुरक्षित असून मानवी शरीर ते सहन करू शकत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अन्य औषधेही शर्यतीत
देशात तसेच जगात आणखी अनेक औषधांवर चाचणी होत आहे. एम्स भोपाळमध्ये मायक्रोबॅक्टीरियम-डब्ल्यू (एमडब्ल्यू)ची चाचणी सुरू करण्यात आली आहे. हे औषध मानवी शरीराला अपायकारक नसल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. अमेरिकेत एयरवे थेरेपॉटिक्स नावाची कंपनी एटी-100 प्रोटीनवर चाचणी करत आहे. तियाना लाइफ सायन्सेस नावाची कंपनी कोविड-19 साठी टीझेडएलएस-501 नावाच्या मोनोक्लोनल अँटीबॉडी विकसित करत आहे. ओयागेनने ओया1 नावाच्या औषधाची चाचणी चालविली आहे. बियाँडस्प्रिंग या कंपनीने बीपीएल-002 नावाच्या मॉलिक्यूल एजंटवर संशोधन सुरू केले आहे. याचबरोबर हायड्रॉक्सी क्लोरोक्विनसंबंधी संशोधन होत आहे.