वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीला दिला वेग : स्वतःची रुग्णालये केली उपलब्ध
जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना विषाणूच्या विरोधातील लढाईत आता देशातील संरक्षण कंपन्यांनीही भाग घेतला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम तसेच शस्त्रनिर्मिती करणाऱया ऑर्डनन्स फॅक्ट्री बोर्डाने या विषाणूच्या विरोधात निर्णायक लढाईची तयारी केली आहे.
आयसोलेशन बेड
सैन्यासाठी शस्त्र निर्माण करणाऱया ओएफबीने 6 राज्यांमध्ये फैलावलेल्या स्वतःच्या 10 रुग्णालयांमध्ये 280 आयसोलेशन बेडची योजना तयार केली आहे. ही रुग्णालये, व्हीकल फॅक्ट्री जबलपूर, धातू तसेच इस्पात फॅक्ट्री ईशापूर (पश्चिम बंगाल), गन अँड शेल फॅक्ट्री कोसिपूर (पश्चिम बंगाल), ऍम्युनिशन फॅक्ट्री खडकी (महाराष्ट्र), ऑर्डनेन्स फॅक्ट्री कानपूर (उत्तरप्रदेश), ऑर्डनेन्स फॅक्ट्री खमरिया, हेवी व्हेईकल फॅक्ट्ररी अवदी (तामिळनाडू) आणि ऑर्डनेन्स फॅक्ट्री मेडक (तेलंगणा) येथे आहेत.
अरुणाचलला मदत
ऑर्डनेन्स फॅक्ट्री बोर्डाने अरुणाचल प्रदेशमधील कोरोना रुग्णांकरता 50 विशिष्ट प्रकारच्या तंबूंची निर्मिती करत राज्य सरकारला मदत केली आहे. ओएफबीने हे काम अत्यंत कमी कालावधीत पूर्ण करत हे तंबू अरुणाचल प्रदेश सरकारला सोपविले आहेत.
एचएएल सरसावले
तेजसलढाऊ विमान आणि चीता, चेतक आणि रुद्र यासारखे हेलिकॉप्टर निर्माण करणाऱया हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने देखील कोरोना विरोधी युद्धात भाग घेतला आहे. एचएएलने बेंगळूर येथील स्वतःच्या रुग्णालयातील आयसीयू कक्षात तीन आणि अन्य कक्षांमध्ये 30 आयसोलेशन बेडची निर्मिती केली आहे. याचबरोबर 30 खोल्यांचे एक भवन देखील तयार करण्यात आले आहे.
सुरक्षा उपकरणे
कानपूर, शाहजहांपूर, हजरतपूर (फिरोजाबाद) तसेच चेन्नई येथील ऑर्डनेन्स इक्विपमेंट फॅक्ट्रीत कव्हर सूट आणि मास्कची निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पांनी अत्यंत कमी काळात या उपकरणांच्या निर्मितीसाठी स्पेशल हीट स्केलिंग यंत्रांची व्यवस्था केली आहे. ओएफबी आठवडय़ाला 5 ते 6 हजार कव्हर सूटचे उत्पादन सुरू करेल. कव्हर सूट आणि मास्कची निर्मिती मापदंडांनुसार केली जात आहे.
व्हेंटिलेटर
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्रालयासाठी 30 हजार व्हेंटिलेटर्सची निर्मिती करण्यात येत आहे. व्हेंटिलेटर्सचे डिझाईन प्रामुख्याने संरक्षण संशोधन तसेच विकास संघटनेकडून करण्यात येत आहे. तर ऑर्डनेन्स फॅक्ट्री मेडकने हैदराबादमध्ये विविध रुग्णालयांमधील व्हेंटिलेटर्सची दुरुस्ती सुरू केली आहे.
सॅनिटायजरची निर्मिती
जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडांनुसार ओएफबीच्या प्रकल्पांमध्ये हँड सॅनिटायजरची निर्मिती करण्यात येत आहे. भारत सरकारकडून केंद्रीकृत खरेदीसाठी नियुक्त नोडल संस्था एचएलएल लाइफकेअर लिमिटेडकडून त्यांना 13 हजार लिटरची मागणी मिळाली आहे. यातील 1500 लिटर सॅनिटायर्जची पहिली खेप 31 मार्च रोजी कोर्डाइट फॅक्ट्री अरुवनकाडु (तामिळनाडू) येथून रवाना झाली आहे. याचबरोबर ऑर्डनेन्स फॅक्ट्री इटारसी (मध्यप्रदेश) आणि ओएफबी भंडारा (महाराष्ट्र) येथेही सॅनिटायजरची निर्मिती मोठय़ा प्रमाणावर होत आहे. संरक्षण मंत्रालयानुसार ओएफबीचे सर्व प्रकल्प मिळून प्रतिदिन 3000 लिटर सॅनिटायजरची निर्मिती करू शकतात.