इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा
जेरूसलेम / वृत्तसंस्था
इस्रायलच्या डिफेन्स बायोलॉजिकल इन्स्टीटय़ूटने कोरोना विषाणूवरील लस तयार केल्याचा दावा संरक्षण नफताली बेन्नेट यांनी केला आहे. इन्स्टीटय़ूटने कोरोना विषाणूच्या अँटीबॉडी तयार करण्यास मोठे यश मिळविले आहे. कोरोना विषाणूवरील लसीच्या विकासाचा टप्पा पूर्ण झाला असून संशोधक आता याचे पेटंट आणि त्याच्या व्यापक प्रमाणावरील उत्पादनाची तयारी करत असल्याचे बेन्नेट यांनी सांगितले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या कार्यालयाच्या अंतर्गत अत्यंत गोपनीय असलेल्या इस्रायल इन्स्टीटय़ूट फॉर बायोलॉजिकल रिसर्चच्या दौऱयानंतर बेन्नेट यांनी ही घोषणा केली आहे. ही अँटीबॉडी मोनोक्लोनकल पद्धतीने कोरोना विषाणूवर आक्रमण करते आणि आजारी लोकांच्या शरीरातच विषाणूचा खात्मा करत असल्याचे बेन्नेट म्हणाले.
डिफेन्स इन्स्टीटय़ूट आता या लसीचे पेटंट प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत आहे. याच्या पुढील टप्प्यात संशोधक आंतरराष्ट्रीय कंपन्याशी व्यावसायिक पातळीवर उत्पादनासाठी संपर्क साधणार आहेत. या अत्यंत मोठय़ा यशाबद्दल इन्स्टीटय़ूटच्या कर्मचाऱयांवर गर्व असल्याचे उद्गार संरक्षणमंत्र्यांनी काढले आहेत. परंतु त्यांनी या लसीची मानवावर चाचणी करण्यात आली का नाही याची माहिती दिलेली नाही.
कोरोना महामारी रोखण्यासाठी जगभरात लस तयार करण्याचे काम सुरू आहे. ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठ माणसांवर सर्वात मोठी चाचणी करत आहे. तर चीन आणि अमेरिकेत देखील माणसांवर मोठय़ा प्रमाणावर कोरोना लसीची चाचणी सुरू आहे. भारतातही अनेक कंपन्यांनी कोरोनावरील लस तयार करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.
अँटीबॉडीचा लागला शोध, कोरोनाला रोखणार
चीनमधून जगभरात फैलावलेल्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परंतु आता जगाला एक मोठा दिलासा देणारी घटना घडली आहे. युरोपमधील वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अँटीबॉडी शोधली आहे. कोविड-19 ला शरीरात फैलावण्यापासून रोखण्याचे काम अँटीबॉडी करणार आहे. या अँटीबॉडीमुळे वैज्ञानिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लवकरच यावर उपचार करण्यासाठी लस तयार केली जाऊ शकते. ही अँटीबॉडी कोरोना विषाणूला तोडून त्याला निष्क्रीय करण्याचे काम करणार आहे. या अँटीबॉडीला 47डी11 नाव देण्यात आले आहे. या अँटीबॉडीमुळे एका व्यक्तीपासून दुसऱया व्यक्तीला विषाणूचा धोका निर्माण होणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यास याची अत्यंत मोलाची मदत होणार आहे.
युरोपच्या वैज्ञानिकांनी उंदरांमध्ये आढळणाऱया 51 सेल लायन्स पेशींमधून याचा शोध लावला आहे. या अँटीबॉडीचा माणसांवरही प्रयोग करण्यात आला आहे. व्यक्तींवर प्रयोग करण्यासाठी जेनेटिकली इंजिनियरिंगची मदत घेण्यात आली आहे. संशोधकांच्या या पथकाचे नेतृत्व युट्रेच विद्यापीठाचे प्राध्यापक बेरेंड जेश बॉश करत आहेत.
अँटीबॉडीची क्षमता कोरोना विषाणूला निष्क्रीय करू शकते. अँटीबॉडीमुळे कोरोना विषाणू शरीरात फैलावण्यास अत्यंत वेळ लागू शकतो. यातून कोविड-19 विषाणू अत्यंत कमजोर होण्यास मदत होईल. तसेच एका व्यक्तीच्या संपर्कात आल्याने दुसऱया व्यक्तीला त्याचा संसर्ग होण्याचे प्रमाण झपाटय़ाने कमी होणार असल्याचे बॉश म्हणाले.
वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत उंदरांवर कोरोना विषाणूचा संसर्ग केला. विषाणू शिरल्यावर उंदरांच्या शरीरात 51 प्रकारे अँटीबॉडी निघणे सुरू झाले. यात 47डी11 ही अँटीबॉडी सामील होती. ही अँटीबॉडी कोरोना विषाणूच्या बाहेरील भागास नष्ट करण्यास मदत करत होती. कोरोना विषाणूचा आकार गोल असून त्याच्या चारही बाजूला एस-2 नावाचे प्रोटीन कंटीला लेयर असतात. हे कंटिला लेयर मानवी शरीरातील पेशींना चिकटतात.