ऑनलाईन टीम / चंदिगढ
जागतिक स्तरावर अनेक देशांच्या चिंतेत भर घालणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरिंयटचा फैलाव झपाट्याने होत आहे. या पार्श्वभुमीवर भारतात ही ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचं वातावरण पसरले आहे. आता महाराष्ट्रात ही ओमिक्रॉनची संख्या वाढती आहे. देशात गेल्या २४ तासात तब्बल ३७ हजार नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच आता पंजाबच्या एका वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाचा विस्फोट झाला असुन एका महाविद्यालयात एकाच वेळी तब्बल १०० विद्यार्थी पॉझिटीव्ह आले आहेत.
हे विद्यार्थी पतियाळा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आहेत यापैकी सुमारे १०० विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. यावर जिल्हा प्रशासनाने तातडीची बैठक घेत वसतिगृहात राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ खोल्या खाली करण्यास सांगितले. यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान, पंजाबमधील ही दुसरी शिक्षण संस्था आहे जी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली आहे. गेल्या आठवड्यात, थापर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, पतियाळा येथील सुमारे ९३ विद्यार्थ्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
महाराष्ट्रातील शाळांबाबत आज निर्णय होण्याची शक्यता
राज्यभरातील शाळांबाबतही आज निर्णय होण्याची शक्यता आहे.वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्यातील कॉलेज सुरू ठेवायचे की ऑनलाइन पद्धतीने चालवायचे याबाबतचा निर्णय दोन ते तीन दिवसांनी परिस्थिती पाहून घेण्यात येणार असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. याबाबत येत्या दोन दिवसांत राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घेण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.