वार्ताहर/ कराड
विजय दिवस समारोह समितीच्या वतीने प्रतिवर्षी 14 ते 16 डिसेंबर दरम्यान साजरा करण्यात येणारा विजय दिवस समारोह यावर्षी कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती समितीचे समितीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
बांगलादेश स्वातंत्र्यलढय़ातील भारतीय सैन्यदलाच्या विजयाप्रीत्यर्थ विजय दिवस समारोह समितीच्या वतीने प्रतिवर्षी कराडला 14 ते 16 डिसेंबरदरम्यान विजय दिवस समारोह भव्य प्रमाणात साजरा करण्यात येतो. देशभक्तीने ओसंडून वाहणाऱया या समारोहात शोभायात्रा, कराड दौड, शस्त्रास्त्र प्रदर्शन, मानपत्र वितरण करण्यात येते. तर 16 रोजी समारोहाच्या मुख्य दिवशी सैन्यदलाच्या कवायती व चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात येतात. हजारो तरुण-तरुणी व नागरिकांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडत असतो.
यावर्षी मात्र राज्य व देशात कोरोनाचे गंभीर संकट असल्याने व समारोहादरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी यावर्षी विजय दिवस समारोह रद्द करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष कर्नल संभाजीराव पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.