प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात शुक्रवारी कोरोना संशयित 143 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 90 जणांचे स्वॅब तपासणीसाठी मिरजेला पाठवले आहेत. शेंडा पार्क येथील लॅबमध्ये चाचणी केलेले स्वॅब पुर्नतपासणीसाठी पुणे एनआयव्हीकडे पाठवले आहेत. इचलकरंजी येथील वृद्धाचा शुक्रवारी सकाळी कोरोना अतिदक्षता वॉर्डमध्ये मृत्यू झाला, पण त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्हय़ात देशांतर्गत प्रवास केलेल्यांपैकी सीपीआर हॉस्पिटलमध्ये 104 जणांची तपासणी केली. त्यापैकी 70 जणांचे स्वॅब घेतले. इचलकरंजीच्या आयजीएम हॉस्पिटलमध्ये 12 जणांची तपासणी करून 9 जणांचे स्वॅब घेतले गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात 11 जणांची तपासणी करून 6 जणांचे स्वॅब घेतले. ऍस्टर आधार हॉस्पिटलमध्ये 8 जणांची तपासणी करून एकाचा स्वॅब घेतला. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये 14 जणांची तपासणी करून 4 स्वॅब घेण्यात आले. ऍपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये दोघांची आणि अंतरंग हॉस्पिटलमध्ये तिघांची तपासणी करण्यात आली. 143 जणांची तपासणी करून 90 जणांचे स्वॅबड तपासणीसाठी सायंकाळी मिरजेला पाठवले आहेत. शुक्रवारी 16 जणांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
सीपीआर हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डमध्ये इचलकरंजी मंगळवार पेठ येथील 66 वर्षीय वृद्ध उपचारार्थ 19 रोजी दाखल झाला होता. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्याचा स्वॅबही घेतला होता. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या वृद्धाचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला आहे. सीपीआरमध्ये नवे 26 रूग्ण दाखल झाले. आयपीडीमध्ये 108 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती सीपीआरमधून देण्यात आली.
शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणी लॅब सुरू झाली आहे. तेथील सीबीनॅट मशिनवर काही स्वॅब तपासले. त्याचे रिपोर्ट पुर्नतपासणीसाठी पुणे एनआयव्हीला पाठवले आहेत. जिल्हय़ात परजिल्हय़ांतून आलेले 85 हजार 156 जणांना कोरोंटाईन केले आहे. त्यापैकी 3 हजार 581 जणांना होम कोरोंटाईन केले आहे. आतापर्यत 81 हजार 575 जणांचा कोरोटाईन कालावधी पूर्ण झाला असून त्यांना घरी पाठवल्याची माहिती प्रशासनाने दिली.