रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले : सक्रिय रुग्णसंख्या हजाराच्या खाली
- सलग दुसऱया दिवशी शंभर रुग्णांना डिस्चार्ज
- आणखी 64 पॉझिटिव्ह, एका रुग्णाचा मृत्यू
- एकूण 2 हजार 848 जण कोरोना मुक्त
- कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 984
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात गेले दोन महिने कोरोना रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असताना गेल्या चार-पाच दिवसांत कोरोनाचा वेग काहीसा मंदावला आहे. जनता कर्फ्यूचाही चांगला परिणाम दिसत आहे. त्यामुळे जिल्हय़ाला तूर्त दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून सक्रिय रुग्णांची संख्या हजाराच्या खाली आली आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. जिल्हय़ातील जनतेने कोरोना नियंत्रणासाठी असेच सहकार्य करून कोविडचे नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान शुक्रवारी नव्याने 64 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर आणखी 100 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्हय़ात गेल्या दोन महिन्यांत रुग्णवाढीबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. मागील पंधरा दिवसांत तर दररोज चार-पाच रुग्णांचा मृत्यू होत होता. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणे चिंतेची बाब ठरली होती. मात्र दररोज 80 ते 90 च्या संख्येत मिळणारे रुग्ण आता 50 ते 60 पर्यंत आले आहेत. गेल्या पाच दिवसांत 286 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. म्हणजेच सरासरी 55 पर्यंत रुग्ण मिळण्याचे प्रमाण खाली आले आहे. त्यामुळे कोरोनाचा वेग मंदावत आहे, असे तूर्त दिसत आहे. तसेच आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा केल्यामुळे मृत्यूचे प्रमाणही कमी होत आहे. गुरुवारी दोन, तर शुक्रवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून सलग दुसऱया दिवशी शुक्रवारी बरे झालेल्या 100 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्याही कमी होऊ लागली असून ती एक हजाराच्या खाली आली आहे.
जनतेने उत्स्फूर्त जनता कर्फ्यू पाळला. तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वी केली, तर निश्चितच कोरोनावर लवकर नियंत्रण आणता येईल. त्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
कोरोनामुक्तांची संख्या तीन हजारानजीक
जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णसंख्या 3 हजार 928 एवढी झाली आहे. तर कोरोनामुक्त संख्या 2 हजार 848 झाली आहे. शुक्रवारी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 96 झाली आहे. सद्यस्थितीत जिल्हय़ात 984 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 26644
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 3928
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 22523
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 193
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 984
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 96
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 2848
गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 3626
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 13084