वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपादरम्यान अनेक औषधनिर्मिती कंपन्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी प्रयत्न गतिमान केले आहेत. याचदरम्यान ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात कोरोनाच्या उपचाराकरता वापरले जाणारे सिप्लेंजा औषध सादर करणार असल्याची घोषणा सिप्लाने केली आहे. विशेष बाब म्हणजे हे औषध बाजारात सद्यकाळात उपलब्ध औषधाच्या तुलनेत 40 टक्क्यांनी स्वस्त असणार आहे. स्वस्त दरात हे औषध तयार करण्यासाठी सिप्लाने देशातच स्वतःचा भागीदार शोधला आहे.
हैदराबादच्या एवरा लेबोरेट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कोरोनावरील औषध तयार करण्यास मंजुरी मिळाली आहे. एवरा लेबोरेट्रीजकडूनही फेविपिराविर एपीआय (ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडिएंट) औषध तयार केले जात असून ते सिप्लाला पुरविले जाणार आहे. कुठलेही औषध निर्माण करण्यासाठी एपीआयचा कच्च्या मालासारखा वापर केला जातो. एवरा लेबोरेट्रीजने अत्यंत कमी खर्चाची निर्मिती प्रक्रिया विकसित केली आहे. या प्रक्रियेद्वारेच एपीआय तयार करून ते सिप्ला कंपनीला पुरविण्यात येणार आहे. सिप्ला याद्वारे सिप्लेंजा औषध बाजारात सादर करण्यात येणार आहे. हे औषध फेविपिराविरचे जेनेरिक स्वरुप आहे.
सिप्लेंजा या औषधाची किंमत 60 रुपये प्रति टॅबलेट असेल. ग्लेनमार्क कंपनीने फेविपिराविर निर्माण केले असून त्याचे नाव फॅबिफ्लू आहे. तसेच याची किंमत 104 रुपये प्रति टॅबलेट इतकी आहे. तर सिप्लेंजा त्याच्याहून 40 टक्के स्वस्त असणार आहे. ग्लेनमार्कप्रमाणे हे पेटंटयुक्त नव्हे तर जेनेरिक औषध असल्याने निर्मिती खर्च कमी राहणार आहे.
पद्मभूषण डॉक्टर एवी रामा राव हे एवरा लेबोरेट्रीजचे संस्थापक आहेत. राव हे सीएसआयआर-आयआयसीटीचे संचालकही राहिले आहेत. भारतीय औषध उद्योगाच्या विकासात राव यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. राव यांच्या मेहनतीमुळेच 1990 च्या दशकात एड्सविरोधी औषध तयार करण्यास यश मिळाले आणि यातून लाखोंचा जीव वाचविता आला होता. राव यांची एवरा लेबोरेट्रीज ही कंपनी मागील 25 वर्षांपासून संशोधन आणि निर्मितीक्षेत्रात कार्यरत आहे.