बांदा शाळा व्यवस्थापन समित्यांच्या बैठकीत ठराव
प्रतिनिधी / बांदा:
जिह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन जबाबदारी झटकत स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती व सरपंच यांनी शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे परिपत्रक काढत आहे. याला विरोध करत जोपर्यंत जिल्हा कोरोनामुक्त होत नाही, तोपर्यंतच शाळा सुरू न करण्याचा निर्णय शहरातील सर्व शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत शहरातील केंद्रशाळा, निमजगा, सटमटवाडी, पानवळ प्राथमिक शाळेचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या एकत्रित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, सरपंच अक्रम खान, जिल्हा परिषद केंद्रशाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलेश मोरजकर, मुख्याध्यापिका सरोज नाईक,
ग्रामपंचायत सदस्या रिया आल्मेडा, उमांगी मयेकर, निमजगा प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भगत, सटमटचे प्रशांत पवार, पानवळचे मुख्याध्यापक देवेंद्र अहिरे, प्रदीप सावंत यांच्यासह शिक्षक, पालक उपस्थित होते.
सामूहिक संसर्गाची भीती
यावेळी शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने काढलेल्या परिपत्रकाचे वाचन करण्यात आले. शहरातील केंद्रशाळा ही सावंतवाडी तालुक्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेली शाळा आहे. त्यामुळे शाळा सुरू केल्यानंतर मुलांना सामूहिक संसर्गाची भीती आहे. शासन जबाबदारी झटकत असल्याने शाळा सुरू न करता आतापर्यंत सुरू असलेल्या शैक्षणीक धोरणानुसार मुलांना शिक्षण देण्यात यावे, असा ठराव सरपंच खान व जिल्हा परिषद सदस्या कोरगावकर यांनी मांडला. सर्व शाळा व्यवस्थापन समित्यांनी या निर्णयाला मान्यता दिली. यावेळी मुलांसाठी ऑनलाईन पद्धतीने विविध उपक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. सूत्रसंचालन जे. डी. पाटील यांनी केले. आभार रंगनाथ परब यांनी मानले.