व्यापक बैठकीत बिम्सच्याच इलाजावर चर्चा : प्रादेशिक आयुक्तांनी ओढले ताशेरे : वरिष्ठ अधिकाऱयांचे उद्वेगजनक उद्गार
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीची दुसरी लाट दिवसेंदिवस अधिक फैलावत चालली आहे. बाधितांची संख्या वाढती आहे. जिल्हा प्रशासनाने महामारी थोपविण्यासाठी सरकारी मार्गसूचीनुसार व्यापक तयारी केली आहे. मात्र, या प्रयत्नांना बिम्स (सरकारी वैद्यकीय महाविद्यालय) प्रशासनाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे बिम्सवर भरवसा ठेवून दुसऱया लाटेचा सामना कसा करायचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रादेशिक आयुक्त आदित्य आमलान बिस्वास यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि. 24 एप्रिल रोजी जिल्हय़ातील वरि÷ अधिकाऱयांची बैठक झाली. दुपारी 3 ते रात्री 9 पर्यंत तब्बल सहा तास ही बैठक चालली. यावरून प्रादेशिक आयुक्त व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांनी किती गांभीर्याने घेतले आहे, हे लक्षात येते. बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांनी मात्र या बैठकीला दांडी मारली आहे. या मुद्दय़ावरून बैठकीत जोरदार चर्चा झाली आहे.
नेहमीप्रमाणे बिम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश दंडगी हे वरिष्ठ अधिकाऱयांच्या बैठकीसाठी उपस्थित होते. गेल्या वषी त्यांनी उत्तमरीतीने परिस्थिती हाताळली असली तरी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत भलत्याच शक्ती काम करतात. कौतुक झाले तर ‘आम्ही केले’ मात्र टीका झाली तर ‘वैद्यकीय अधीक्षकांमुळे ही परिस्थिती ओढवली’ असे भासविण्याचा प्रयत्न काही जणांना नेहमी असतो. आता प्रादेशिक आयुक्तांनाही परिस्थितीची जाणीव झाली आहे.
वैद्यकीय संचालकांची अनुपस्थिती
शनिवारी तब्बल सहा तास झालेल्या व्यापक बैठकीचा तपशील ‘तरुण भारत’ला उपलब्ध झाला आहे. डॉ. विनय दास्तीकोप यांच्या अनुपस्थितीवर बरीच चर्चा झाली असून ‘त्यांना कधी वेळ आहे हे विचारा, त्यांच्या सोयीनुसार आपण पुढची बैठक घेऊ’ असे उद्वेगजनक उद्गार वरि÷ अधिकाऱयांनी काढले आहेत. यावरून बिम्समध्ये काय चालले आहे? हे लक्षात येते. वेळीच सावध व्हा, रुग्णसेवेसाठी स्वतःला गुंतवा. नपेक्षा गय केली जाणार नाही, असा इशारा प्रादेशिक आयुक्तांनी दिला आहे.
या बैठकीत बिम्समधील सर्व घडामोडींचा आढावा घेण्यात आला आहे. अनेक डॉक्टर प्रत्यक्षात सेवेवर नसतात. ज्युनियर डॉक्टरांवर भार टाकून आपण मोकळे फिरत असतात. बिम्स प्रशासनामध्ये ताळमेळ नाही, ती एक स्वायत्त संस्था आहे, तरीही सरकारच्या ध्येयधोरणांनुसार व मार्गसूचीनुसार तिचा कारभार चालवावा लागतो. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेता बिम्समध्ये मनमानी सुरू झाली असून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना या परिस्थितीत बदल करण्यासाठी प्रादेशिक आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे.
परिस्थिती सुधारा, अन्यथा…
बिम्समधील कामचुकारांवर नजर ठेवण्यासाठीच अप्पर जिल्हाधिकारी योगेश्वर यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून नियमानुसार कामाचे वाटप होते की नाही? नियुक्ती झालेल्या ठिकाणी संबंधित डॉक्टर काम करतात की नाही? हे तपासण्याचे काम अप्पर जिल्हाधिकारी करणार आहेत. बिम्स प्रशासनाची वेसण आवळण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली असून तरीही परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर संबंधितांवर कारवाई करण्याचा विचारही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.