उद्या जीएसटी मंडळाच्या बैठकीत होणार चर्चा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेत शनिवारी वस्तू-सेवा कर मंडळाची (जीएसटी कौन्सिल) महत्वपूर्ण बैठक होणार आहे. कोरोना उपचारांसाठी आणि लसनिर्मितीसाठी तसेच ब्लॅक फंगस वरील उपचारांसाठी लागणाऱया सामग्रीवरील तसेच औषधांवरच्या करांमध्ये कपात करण्याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
28 मे या दिवशी मंडळाची बैठक घेण्यात आली होती. बहुतेक सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी या बैठकीत भाग घेतला होता. कोरोनावरील औषधे, उपचारांची सामग्री आणि इतर साधनांवरील कर कपातीवर विचार करण्यासाठी मंत्रीगटाची स्थापना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. या गटाने आपला अहवाल 7 जूनला केंद्र सरकारकडे सुपूर्द केला. तो 12 जूनच्या बैठकीत मांडण्यात येईल.
अर्थमंत्र्यांची मागणी
कोरोना सामग्रीवरील करात कपात करण्यात यावी तसेच यातील काही सामग्रीवरील कर पूर्णतः काढून टाकण्यात यावा, अशी मागणी काही राज्यांनी करमंडळाकडे केली होती. कर कमी करावा अशी अनेक राज्यांची इच्छा आहे. मात्र, या संदर्भात सर्व राज्ये वस्तू-सेवा करमंडळाच्या निर्णयाशी बांधील असतील, अशी माहिती उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सुरेश कुमार शर्मा यांनी दिली.
लसीवरही विचार होणार
कोरोनाच्या लसी आणि विशिष्ट औषधे तसेच चाचण्या घेण्यासाठी उपयुक्त साधने यांच्या आयातीवरही बैठकीत विचार केला जाणार आहे. ब्लॅक फंगसवर उपयुक्त ठरणाऱया अँफोटेरिसीन या औषधावरील सीमाशुल्क काढून टाकण्याचा निर्णय मागच्या बैठकीत घेण्यात आला होता. परंतु या निर्णयाने भागणार नाही, असे विरोधी पक्षशासित राज्यांचे म्हणणे होते. त्यामुळे केंद्र सरकारनेही करकपातीचा विचार चालविला असल्याचे सांगण्यात येते. त्यादृष्टीने शनिवारची बैठक महत्वाची ठरणार आहे.