कोरोना हरतोय…3124 जणांना डिस्चार्ज
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाचे संक्रमण कमी होत असताना रिकव्हरी वाढू लागली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत बाधितांचे आकडे जास्त आणि कोरोनामुक्ती कमी असे चित्र होते. आता रूग्णसंख्या कमी होऊ लागल्यानंतर बाधितांच्या आकडय़ापेक्षा कोरोनामुक्त होणारांचे प्रमाण वाढत असल्याचे सुचिन्ह दिसू लागले आहेत. शुक्रवारी तब्बल 3 हजार 124 जणांनी कोरानावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाला आम्ही हरवतोय, हा दृढविश्वास पहिल्यापेक्षा प्रखर असणाऱया दुसऱया लाटेत बळावू लागला आहे. सकाळी आलेल्या अहवालात 1875 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर 31 मृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोनावर नियंत्रण येत असताना म्युकरमायकोसिस या आजाराचे आव्हान प्रशासनासमोर आहे. गुरूवारी या आजाराने पहिला बळी घेतला आहे.
सात दिवसांत 15 हजारांहून अधिक रूग्ण घरी
मुंबई-पुण्यात संक्रमण कमी झाल्यानंतर आता सातारा जिल्हय़ातही संक्रमण कमी होऊ लागले असून डिस्चार्ज वाढला आहे. दुसऱया लाटेने उच्चांकी बाधितांची नोंद केली असली तरी मध्यंतरी 2 हजारावर आकडा स्थिर झाला होता. आता तो कमी होऊ लागला आहे. यातच रिकव्हरी वाढली असून रोजचा डिस्चार्ज वाढला आहे. 14 ते 21 मे या सात दिवसांत तब्बल 15 हजार 866 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दुसऱया लाटेने नुकसान वाढवले असले तरी आता बरे होणारांचे प्रमाण वाढत आहे. आम्ही कोरोनाला हरवतोय, हा विश्वास आता आरोग्यकर्मी आणि जिल्हा प्रशासनात वाढू लागला आहे.
1875 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित
गेल्या 24 तासात 5 हजार 790 संशयितांच्या चाचण्या झाल्या असून त्यामध्ये जिह्यात 1875 रूग्णांची नव्याने वाढ झाली आहे. या वाढीनंतर पॉझिटिव्हिटी रेट 32.38 वर आला आहे. यात साताऱयात सर्वाधिक रूग्ण वाढ झाली असून दुसऱया क्रमांकावर फलटण तालुका आहे. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे- जावली 53 (6797), कराड 248 (20268), खंडाळा 98 (8871), खटाव 260 (12979), कोरेगाव 156 (12553), माण 117 (9810), महाबळेश्वर 13 (3826), पाटण 63 (5942), फलटण 372 (19951), सातारा 394 (32281), वाई 82 (10664 ) व इतर 19 (901) असे आजअखेर एकूण 144843 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
31 बाधित रूग्णांचा मृत्यू
गेल्या चोवीस तासात जिल्हय़ात 31 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक मृत्यू सातारा तालुक्यात झाले आहेत. आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे- जावली 1 (148), कराड 3 (587), खंडाळा 6 (122), खटाव 4 (360), कोरेगाव 2 (290), माण 1 (191), महाबळेश्वर 1 (42), पाटण 1 (145), फलटण 1 (239), सातारा 8 (950), वाई 3 (285) , व इतर 0 असा आजअखेर जिह्यामध्ये एकूण 3359कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
1034 जणांना लसीकरण
शुक्रवारी जिल्हय़ात 1034 जणांनी लस घेतली. आजअखेर झालेले लसीकरण पहिला डोस – 577118, दुसरा डोस – 117568 असे एकूण 694686 जणांना लसीकरण करण्यात आले आहे. लस तुटवडा कायम असून मोफत नसेल तर विकत तरी लस द्या, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक करत आहेत.
शुक्रवारी जिल्हय़ात
एकूण बाधित 1875
एकूण मुक्त 3124
एकूण बळी 31
शुक्रवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने -664993
एकूण बाधित – 144843
घरी सोडण्यात आलेले -123770
मृत्यू -3359
उपचारार्थ रुग्ण-17710