बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के
प्रतिनिधी /पणजी
राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असल्याचे दिसून येत असले तरीही रोजच्या बळींचे सत्र अद्याप सुरुच असून रोजची बळींची संख्या अद्याप 5च्या खाली येत नाही. गेल्या संपूर्ण आठवडय़ात ही संख्या 5 ते 11 अशीच चढउतार दाखवत राहिली आहे. त्याचबरोबर बाधितांची रोजची संख्याही गत आठवडय़ात 200 ते 300 या दरम्यान नोंद झाली आहे.
रविवारी राज्यात 7 जणांचे बळी गेले व 215 बाधित सापडले आहेत. 301 जण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्क्यांवर पोहोचले आहे. सक्रिय रुग्णसंख्या 2511 एवढी झाली आहे.
रविवारी 3120 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 215 बाधित सापडले. त्यापैकी 28 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले तर 187 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले. त्याचबरोबर 36 जणांना गोमेकॉतून घरी पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत वर्षभरातील एकूण बाधितसंख्या 166098 वर पोहोचली आाहे तर एकूण 160548 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण मृतसंख्या 3039 वर पोहोचली आहे.
रविवारी नोंद झालेल्या 7 बळींमध्ये 6 गोमेकॉत, तर दक्षिण गोव्यातील खाजगी इस्पितळात मृत्यू झालेल्या एकाचा समावेश आहे. या मृतांमध्ये सर्वजण 39 ते 78 वर्षे वयोगटातील आहेत. त्यात 5 पुरुष व 2 महिला रुग्णाचा समावेश आहे.
कासारवर्णेत सर्वात कमी रुग्ण
राज्यातील 33 पैकी 24 केंद्रातील रुग्णसंख्या दोन अंकी संख्येवर आली आहे. अन्य केंद्रात तीन अंकी संख्येने रुग्ण आहेत. त्यातील सर्वाधिक 166 रुग्ण फोंडा केंद्रात तर त्या खालोखाल मडगावात 141, काणकोणात 135, सांखळीत 126, पणजीत 123, कांदोळी 112, कुठ्ठाळी 104, चिंबल 101 व शिवोलीत 100 रुग्ण आहेत. सर्वात कमी 19 रुग्ण कासारवर्णे केंद्रात आहेत.
विदेशी नागरिकांचेही होणार लसीकरण
गोव्यात राहाणाऱया विदेशी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे सरकारने ठरविले असून त्याची यादी तयार करण्याचे काम तलाठी, पोलिसांना देण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱयांनी मामलेदारांना दिला असून त्यांनी तो अंमलात आणण्याची सूचना करण्यात आली आहे.
अनेक विदेशी नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्ताने गोव्यात वास्तव्य करतात. त्यांना अनेक कारणांमुळे मायदेशी जाता येत नाही किंवा लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत अशा सर्वांना शोधून यादी बनवा, असे निर्देश देण्यत आले आहेत.
अनेक विदेशी नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस बंधनकारक करण्यात आले आहेत. त्याशिवाय त्यांना मायदेशात प्रवेश मिळत नाही. त्यामुळे अनेक विदेशी नागरिकांनी डोसची मागणी केली होती. त्यास अनुसरुन हे डोस देण्यात येणार आहेत.
कागदपत्राविना होणार लसीकरण
गोव्यात राहाणाऱया बहुतेक विदेशी नागरिकाकडे भारत देशाची कोणतीच कागदपत्रे नाहीत. त्यामुळे त्यांना लस देण्यास अडचणी येत असून ती दूर करण्यासाठी कागदपत्रांविना त्यांना लस देण्यात येणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. विदेशी नागरिकांची माहिती मिळविण्यासाठी नगरपालिका, पंचायती, स्थानिक लोकप्रतिनिधी, पंच यांची मदत घ्यावी व त्यांची नाव, पत्यासह यादी करुन ती जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावी, असे मामलेदारांना कळविण्यात आले आहे.
संसर्ग वाढण्याच्या शक्यतेने लसीकरण
सध्या गोवा सरकारने लसीकरणावर भर दिला असून गोव्यात असलेल्या विदेशी नागरिकांना जर कोरोनाचा संसर्ग झाला तर तो पुन्हा वाढू शकतो. सध्या गोव्यात असलेल्या परदेशी नागरिकांना लस मिळत नाही. त्यामुळे ते कोरोनाबाधित झाले तर स्थानिकांना बाधित करु शकतात. तो संसर्ग टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी नमूद केले.