लोकांनी मास्क, सामाजिक अंतर राखण्याची गरज : गर्दीच्या ठिकाणी पोलिसांच्या कारवाईची मागणी
प्रतिनिधी /पणजी
गेल्या 24 तासात म्हणजे बुधवारी कोरोनाचे तब्बल 200 नवे रूग्ण सापडले असून एकाचा बळी गेल्याचीही नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण मृतांचा आकडा 830 वर पोहोचला असून सक्रीय रूग्ण दीड हजार पार होऊन 1556 एवढे झाले आहेत. वास्को आरोग्य केंद्राने कोरोना रूग्णांची पुन्हा एकदा शंभरी गाठली असून तेथील रूग्ण संख्या 108 झाली आहे. वास्कोसह, पणजी, कांदोळी, पर्वरी, फोंडा, मडगांव या आरोग्य केंद्रातील कोरोना रूग्णांनी देखील शंभरी पार केली आहे.
कुठ्ठाळीत रूग्ण 81 झाले असून म्हापसा आरोग्य केंद्रातील रूग्ण 83 वर पोहोचले आहेत. काल 62 रूग्ण बरे होऊन घरी परतले तर 36 जणांना संशयित रूग्ण म्हणून गोमेकॉत भरती करण्यात आले आहे. शिवाय 203 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. आतापर्यंत मिळून एकूण कोरोना रूग्णसंख्या 58039 एवढी झाली असून त्यातील 55653 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रूग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे- डिचोली-27, सांखळी-35, पेडणे-21, वाळपई-1, म्हापसा-83, पणजी 165, हळदोणा-36, बेतकी 21, कांदोळी-114, कासारवर्णे-7, कोलवाळ-16, खोर्ली-29, चिंबल-44, शिवोली-56, पर्वरी-130, मये-3, कुडचडे-21, काणकोण-13, मडगांव-173, वास्को-108, बाळ्ळी-17, कासावली-64, चिंचिणी-40, कुठ्ठाळी-81, कुडतरी-16, लोटली-37, मडकई-9, केपे-10, सांगे-2, शिरोडा-7, धारबांदोडा-19, फोंडा-121, नावेली-22. विविध मार्गाने गोव्यात आलेल्या 8 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. काही आरोग्य केंद्रे कोरोना रूग्णांपासून मुक्त झाली होती तेथेही पुन्हा नव्याने रूग्ण सापडले आहेत.
पणजी, मडगाव हॉटस्पॉट बनण्याच्या दिशेने
राज्यातील पणजी व मडगाव ही दोन प्रमुख शहरे कोरोना रूग्णांचे ‘हॉटस्पॉट’ बनत असल्याचे दिसून येत आहे. पणजीची रूग्णसंख्या 165 असून मडगाव आरोग्य केंद्रातील रूग्णसंख्या 173 झाली आहे. गोव्यात विविध मार्गाने येणाऱया प्रवासी-पर्यटक यांच्यासाठी कोणतीच एसओपी नसल्यामुळे त्यांची छाननी होत नाही. परिणामी सर्वांना गोव्यात येण्यासाठी मोकळे रानच मिळाले आहे. देशातील बहुतेक राज्यांनी इतर राज्यातील प्रवाशांसाठी एसओपी लागू केली असून त्याचे पालनही सुरू केले आहे. परंतु गोव्याने मात्र तसे काहीच केलेले नाही.
मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा प्रस्ताव फेटाळला
आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची एसओपी लागू करा म्हणून मागणी करीत आहेत. तसा प्रस्ताव असलेली फाईलही त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे पाठवली होती. परंतु त्यास डॉ. सावंत यांनी फारशी किंमत दिली नाही. उलट गोव्यात येणाऱयांना कोरोना चाचणीची सक्ती करण्याची सध्या तरी गरज नाही, असे निवेदन करून राणेंचा प्रस्ताव फेटाळून लावला.
मार्च महिन्यात झपाटय़ाने वाढले रुग्ण
काल संपलेल्या मार्च महिन्यात कोरोनाचे रूग्ण वेगाने मोठय़ा प्रमाणात वाढले असून तत्पूर्वीच्या फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचे रूग्ण 500 पेक्षा कमी होते. परंतु गेल्या महिन्याभरात कोरोनाने पुन्हा एकदा उसळी मारल्याने सक्रीय कोरोना रूग्ण दीड हजार पार झाले आहेत. शिवाय दर दिवशी किमान एक तरी बळी जात आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी 144 कलम जारी केल्याचे सरकार सांगत असले तरी त्याच्या अंमलबजावणीबाबत सरकारला गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे सर्व परिस्थिती चिंताजनक असल्याचे समोर येत आहे.
- 31 मार्चपर्यंतचे एकूण रूग्ण – 58039
- 31 मार्चपर्यंतचे बरे झालेले रूग्ण- 55653
- 31 मार्चपर्यंतचे सक्रीय कोरोना रूग्ण- 1556
- 31 मार्चचे नवीन रूग्ण – 200
- 31 मार्चचे बरे झालेले रूग्ण- 62
- 31 मार्चचे कोरोना बळी- 1
- आतापर्यंतचे एकूण बळी- 830