दिवसभरात 3120 कोरोनामुक्त
प्रतिनिधी / पणजी
मंगळवारी कोरोनाचे आणखी 45 बळी गेले आहेत, तर दुसऱया बाजूने प्रत्यक्ष बाधितांपेक्षा बरे होण्याच्या प्रमाणात समाधानकारक वाढ होत आहे. त्याचबरोबर सक्रीय रुग्णसंख्याही झपाटय़ाने खाली येत असल्याचे दिसून आले आहे. दिवसभरात 1358 बाधित सापडले तर 3120 रुग्ण बरे झाले आहेत. त्याशिवाय गत आठवडय़ात तब्बल 32 हजार पार गेलेली सक्रिय रुग्णसंख्या 23946 एवढी झाली आहे.
गत 24 तासात 45 जण दगावल्याने गेल्या वर्षापासून आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या 2197 वर पोहोचली आहे. आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 138776 एवढी झाली असून त्यातील 112633 जण बरे झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण 81.16 टक्के आहे. गत 24 तासात 184 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले तर 1180 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. मंगळावारी बळी गेलेल्या 45 जणांमधील सर्वाधिक 26 मृत्यू गोमेकॉत झाले आहेत. त्याशिवाय दक्षिण जिल्हा इस्पितळात 11, उत्तर जिल्हा इस्पितळात 1, हॉस्पिसियोत 1, दक्षिण गोवा खाजगी रुग्णालयात 3, उत्तर गोवा खाजगी रुग्णालयात 2 व फोंडा उपजिल्हा रुग्णालयात 1 मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूसंख्येपैकी निम्मे बळी हे मे महिन्याच्या पहिल्या दोन आठवडय़ांतच नोंदविले गेले आहेत.
‘ब्लॅक फंगस’ रोगाचा गोव्यात पहिला बळी : आणखी सहा जणांवर उपचार सुरूआणखी सहा जणांवर उपचार सुरू
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोरोना नंतर ‘ब्लॅक फंगस’ काळी बुरशी या नावाने पसरलेल्या रोगाने भीतीदायक वातावरण निर्माण करून ठेवले आहे. आता हा रोग गोव्यातही पोहाचला आहे. या रोगाने गोव्यात एक व्यक्ती मरण पावली असून आणखी 6 जण सध्या उपचार घेत आहेत.
ब्लॅक फंगस या नावाने ओळखल्या जाणाऱया या रोगाने छाती धडधडायला सुरूवात झाली आहे. मात्र कोणी घाबरून जाण्याची गरज नाही. केवळ त्याचा प्रभाव आपल्यावर पडून नये यासाठी कोविड रुग्णांनी विशेषतः ज्यांना मधूमेह आहे यांनी काळजी घेण्याची गरज आहे.
कोरोनाच्या विषाणुमुळे होतो रोग
इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने मध्यंतरी एक माहिती प्रकाशित केली होती. त्यानुसार हा तसा दुर्मीळ आजार आहे. मात्र कोरोनाची लागण लागण्याअगोदर अन्य काही समस्या असतील आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना या रोगाची बाधा होऊ शकते. हा रोग कोरोनाच्या विषाणूमुळेच होत असतो. नाकात एका बाजूला ही बुरशी तयार होते व पुढे ती शरीरात प्रवेश करून काही वेळा डोळय़ांवर अतिक्रमण करते. यात माणसाची दृष्टीही जाण्याची भीती असते. काही वेळा माणसाच्या त्वचेवर या बुरशीचा परिणाम होतो.
ताप येणे, डोके दुखणे, खोकला येणे, श्वास घेण्यात अडचण होणे, डोळे लालसर होणे, डोळय़ात वेदना येणे, डोळा सुजणे, एखादी गोष्ट दोन दोन दिसणे, चेहऱयावर सुज येणे, दात दुखी, अन्न चावण्यास त्रास होणे, उलटय़ा होणे वा खोकताना रक्त पडणे इत्यादी बाबी या काळय़ा बुरशीची लक्षणे ठरतात.
प्रत्येकाने त्यासाठी फार काळजी घेतली पाहिजे. आपल्या अंगात विशेषतः नाकातून धूळ जाणार नाही यासाठी मास्क वापरणे आवश्यक आहे. स्वच्छतेची काळजी घेणे, मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी होईल तेवढे प्रयत्न प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.
म्युकर मायकोसीसचे देशात 1600 रुग्ण
इंग्रजीत म्युकर मायकोसीस या नावाने ओळखल्या जाणाऱया या रोगाने देशात अलिकडे प्रवेश केला. मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, झारखंड व गोव्यातही रुग्ण आढळून आले आहेत. देशभरात साधारणतः सध्या तरी 1600 रुग्ण आहेत. नाकातून सुरू होणारी ही बुरशी हळूहळू पसरत डोळय़ापर्यंत जाते या साठीच जेव्हा या बुरशीचे संक्रमण सुरू होते, त्याचवेळी काळजी घेणे व योग्य उपचार करून घेणे आवश्यक आहे. कोविड बाधित, मधुमेही रुग्ण, कर्करोग व ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते अशा रुग्णांमध्ये ही काळी बुरशी जास्त वेगाने संक्रमण करू शकते. हा धोका टाळण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे आवश्यक आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी आपल्या शरीरात योग्य प्रकारे साखरेचे प्रमाण आहे की नाही याची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. तसेच लाल डोळे झाल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणे आवश्यक आहे.