प्रतिनिधी / पणजी
राज्यात कोरोना बाधितांची संख्या बऱयापैकी नियंत्रणात येत असून रविवारी ती संख्या 645 एवढी नोंदविली गेली आहे. शनिवारच्या आकडेवारीच्या तुलनेत ही संख्या सुमारे 300 ने कमी आहे. त्याचबरोबर सक्रिय रुग्णसंख्याही मोठय़ा प्रमाणात घटत असून रविवारी रुग्णसंख्या 14010 एवढी होती.
रविवारी 28 जणांचे बळी गेले असून गेल्या वर्षीपासून आतापर्यंत एकूण बळींची संख्या 2625 तर एकूण बाधितसंख्या 155064 वर पोहोचली आहे. गत 24 तासात बरे झालेल्या 1663 रुग्णांसह एकूण 138429 जण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारी 3242 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 645 बाधित सापडले. त्यापैकी 99 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले तर 546 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. बरे होण्याचे प्रमाण 89.27 टक्क्यांवर पोहोचले आहे.
रविवारी बळी गेलेल्या 28 जणांपैकी 17 गोमेकॉत व दक्षिण जिल्हा इस्पितळात 9 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्याशिवाय उत्तर आणि दक्षिण गोव्यातील खाजगी रुग्णालयात प्रत्येकी 1 रुग्ण दगावला आहे. या मृतांमध्ये 28 पासून 91 वर्षे वयोगटातील 16 पुरुष आणि 12 महिला रुग्णांचा समावेश आहे. या बळींपैकी 5 जणांनी कोरोनाची पहिली लस घेतली होती, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
मडगावात 1283 रुग्ण
राज्यातील 33 पैकी मडगाव केंद्रात शुक्रवारी 1283 रुग्ण होते. अन्य केंद्रांपैकी फोंडा येथे 855, कांदोळीत 699 व पणजीत 694 रुग्ण आहेत. अन्य सर्वत्र त्यापेक्षा कमी रुग्ण आहेत. सर्वात कमी 120 रुग्ण मये केंद्रात आहेत.