ऑनलाईन टीम / नागपूर :
नागपूरमधील विचारवंत, लेखक, अभिनेते वीरा साथीदार यांचे कोरोनाने निधन झाले आहे. वीरा साथीदार यांनी 19 मार्च रोजी कोरोनाची लस घेतली होती. त्यानंतर 10 दिवसांनीच त्यांना ते कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर, उपचारा दरम्यान, आज सकाळी एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
2017 साली आलेल्या ‘कोर्ट’ या सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यांनी कोर्ट या सिनेमात पहिल्यांदाच अभिनय केला होता. ‘कोर्ट’ सिनेमासाठी दोनशे लोकांचे ऑडीशन घेण्यात आले होते. मात्र त्यानंतर सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी वीरा साथीदार यांना विचारण्यात आले आणि त्यांनी होकार दिला. या सिनेमात नारायण कांबळे ही मुख्य भूमिका त्यांनी साकारली होती. या सिनेमाने अनेक पुरस्कार पटकावत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नाव कोरले. एवढेच नाही तर सिनेमाने ऑस्करपर्यंत मजल मारली. ‘बेस्ट फॉरेन फिल्म’ या श्रेणीत ‘कोर्ट’ सिनेमाची निवड झाली होती. शिवाय सिनेमातील वीरा साथीदार यांच्या अभिनयाच भरपूर कौतुक झाले होते.
- आंबेडकरी विचारांचा पगडा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वीरा साथीदार यांच्यावर पगडा होता. ते स्वत: गीतकार, पत्रकार होते. आंबेडकर चळवळीतील अनेक गाणीही त्यांनी गायली होती. विविध ठिकाणी ते मार्गदर्शनपर व्याख्याने द्यायचे. पुढे पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी शोषित-पीडितांना न्याय देण्यासाठी मोठा संघर्ष केला. ‘विद्रोही’ नावाच्या मासिकाचे संपादन केले. ‘रिपब्लिकन पँथर’ संघटनेच्या माध्यमातून ते वंचितांसाठी काम करत होते.