ऑनलाईन टीम / कोलंबिया :
अमेरिकेच्या कोलंबिया शहरात क्रिस्टोफर कोलंबस यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर स्थानिक महापालिकेने हा पुतळा भांडारगृहात हलविला आहे.
आफ्रिकन वंशाच्या जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय नागरिकाची पोलिसांकडून हत्या झाल्यानंतर अमेरिकेत वर्णभेदविरोधी आंदोलनाचा भडका उडाला आहे. आंदोलक अनेक पुतळ्यांना लक्ष्य करून त्यांची विटंबना करत आहेत. कोलंबियातील रिव्हरफ्रंट उद्यानात कोलंबस यांचा पुतळा होता. शुक्रवारी आंदोलकांनी या पुतळ्याची विटंबना केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. पुतळ्यामुळे निर्माण होणारी गंभीर स्थिती लक्षात घेऊन महापालिकेने हा पुतळा भांडरगृहात हलविला आहे.
क्रिस्टोफर कोलंबस या इटालियन व्यक्तीने 1492 मध्ये अमेरिकेचा शोध लावला होता. मोठ्या समुद्रसफरीनंतर तो उत्तर अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर पोहचला होता. त्याच्या या साहसाप्रती आणि सन्मानार्थ या शहराला 1786 साली कोलंबिया नाव देण्यात आले आहे. मात्र, आता या शहरात त्याच्याच पुतळ्याची विटंबना केली जात आहे.