वृत्तसंस्था/ कोलंबो
जेफ्री व्हँडेरेसीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर येथे झालेल्या लंका प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात कोलंबो स्टार्सने कँडी वॉरियर्सचा 58 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात व्हँडेरेसीने 25 धावात 6 गडी बाद केले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलंबो स्टार्सने 20 षटकात 6 बाद 182 धावा जमविल्या. त्यानंतर कँडी वॉरियर्सचा डाव 17 षटकांत 124 धावांत आटोपला. कोलंबो स्टार्सच्या डावामध्ये कुशल परेराने दोन षटकार आणि 6 चौकारांसह 38 चेंडूत 58 धावा झळकविल्या. धनंजय डिसिल्वाने 40 तर चंडिमलने नाबाद 44 धावांचे योगदान दिले. चंडिमलने संघाच्या डावातील शेवटच्या दोन षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करताना दोन षटकार, तीन चौकार ठोकले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना व्हँडेरेसीच्या अचूक गोलंदाजीसमोर कँडी वॉरियर्सचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. व्हँडेरेसीने कँडी वॉरियर्सची सलामीची जोडी लेवीस आणि भानुका यांना तिसऱया षटकात बाद केले. कँडी वॉरियर्सतर्फे रवी बोपाराने एकाकी लढत देत 31 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 47 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक
कोलंबो स्टार्स 20 षटकात 6 बाद 182 (कुशल परेरा 58, धनंजय डिसिल्वा 40, दिनेश चंडीमल नाबाद 44), कँडी वॉरियर्स 17 षटकांत सर्वबाद 124 ( रवि बोपारा 47, व्हँडेरेसी 6-25).