वृत्तसंस्था/ मुंबई
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सोमवारी येथे कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल. या स्पर्धेतील गेल्या पाच सामन्यात सलग पराभव पत्करणारा कोलकाता संघ आपली पराभवाची मालिका खंडीत करण्यासाठी प्रयत्न करेल.
कोलकाता संघातील फलंदाज वेंकटेश अय्यर सध्या फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत आहे. दरम्यान कोलकाताच्या फलंदाजी क्रमवारीत वरच्या फलंदाजांच्या स्थानामध्ये वारंवार बदल करण्यात आल्याने या संघाला सलग पराभवाला सामोरे जावे लागत आहे. सोमवारच्या सामन्यात बलाढय़ राजस्थानविरूद्ध विजय मिळविण्यासाठी कोलकाताचा संघ विनिंग कॉम्बिनेशन शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. वरच्या फळीमध्ये फलंदाजी करताना वेंकटेश अय्यरला अधिक धावा जमविता आल्या नाहीत. गेल्या सामन्यात फिंचबरोबर वेंकटेश अय्यरला सलामीला पाठविले पण पुन्हा तो अपयशी ठरला. या स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी कोलकाता संघाला अंतिम अकरा अचूक खेळाडूं निवडावे लागतील. कर्णधार श्रेयस अय्यरने फलंदाजीत बऱयापैकी सातत्य राखताना 36.25 धावांच्या सरासरीने 290 धावा जमविल्या पण त्याला संघ साथीदारांकडून साथ मिळवू शकली नाही. कोलाकाता संघातील टीम साऊदी, उमेश यादव आणि सुनील नरेन यांची कामगिरी आतापर्यंत चांगली झाली आहे.
राजस्थान संघाच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने सलामीच्या बहरात असलेल्या जोश बटलरवर राहील. बटलरने या स्पर्धेत आतापर्यंत 70.75 धावांच्या सरासरीने 566 धावा झळकविल्या आहेत. प्रत्येक सामन्यात बटलरची फटकेबाजी राजस्थानला विजय मिळवून देण्यास महत्त्वाची ठरली आहे. कर्णधार संजीव सॅमसनला आपल्या कामगिरीत सातत्य राखावे लागेल. या स्पर्धेत राजस्थान संघाच्या गोलंदाजीची बाजू इतर संघाच्या तुलनेत दर्जेदार म्हणून ओळखली जाते. राजस्थान संघाला शनिवारच्या सामन्यात अधिक दव पडल्याने मुंबई इंडियन्सकडून हार पत्करावी लागली होती. राजस्थान संघातील फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलने या स्पर्धेत आतापर्यंत 13.68 धावांच्या सरासरीने 19 गडी बाद करून आघाडीचे स्थान मिळविले आहे. राजस्थान संघाची गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने चहल, बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर राहील. राजस्थान संघ पुन्हा सोमवारच्या सामन्यात विजय मिळवून या स्पर्धेत आघाडी मिळविण्यासाठी प्रयत्न करेल.
कोलकाता नाईट रायडर्स– श्रेयस अय्यर (कर्णधार), फिंच, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नितेश राणा, प्रथम सिंग, रिंकू सिंग,. अशोक शर्मा, कमिन्स, रसिक दार, शिवम मावी, साऊदी, उमेश यादव, वरूण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रस्सेल, अंकुल रॉय, चमिका करूणारत्ने, मोहम्मद नबी, रमेशकुमार, सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, बिलिंग्ज आणि जॅक्सन.
राजस्थान रॉयल्स– संजीव सॅमसन (कर्णधार), बटलर, जसवाल, रविचंद्रन अश्विन, बोल्ट, हेटमेयर, करीप्पा, पडीकल, प्रसिद्ध कृष्णा, यजुवेंद्र चहल, पराग, नवजीत सैनी, मॅकॉय, अनुनेय सिंग, कुलदीप सेन, करूण नायर, जुरेल, बेरोका, कुलदीप यादव, गडवाल, निश्चॅम, कोल्टर-नाईल, व्हॅन डेर डय़ुसेन आणि मिचेल.