वृत्तसंस्था/ दुबई
आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱया टप्प्यात रविवारी येथे कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात महत्त्वाचा सामना खेळविला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार रविवारी सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल.
हैदराबाद संघाचे या स्पर्धेत प्ले ऑफ गटात पोहचण्याचे आव्हान यापूर्वी संपुष्टात आले आहे. हैदराबादचा संघ स्पर्धेच्या गुणतक्त्यात शेवटच्या स्थानावर आहे. हैदराबादने या स्पर्धेत आतापर्यंत 11 पैकी 9 सामने गमविले आहेत. मॉर्गनच्या नेतृत्वाखाली कोलकाता संघ स्पर्धेच्या गुणतक्त्यात सध्या 12 सामन्यांतून 10 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. कोलकाता संघाला या स्पर्धेची प्ले ऑफ फेरी गाठण्यासाठी रविवारच्या सामन्यात विजयाची नितांत गरज आहे. मात्र हैदराबादचा संघ कोलकाता संघाला प्ले ऑफ गटापासून अलिप्त ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. या स्पर्धेमध्ये चेन्नई आणि दिल्ली या दोन संघांनी प्ले ऑफ गटातील आपले स्थान निश्चित केले आहे. कोलकाता संघाला आजच्या सामन्यात फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही चांगली कामगिरी करावी लागेल.