अग्निशमन दलाच्या 4 कर्मचाऱयांचा मृतांमध्ये समावेश
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील स्ट्रँड रोड भागात सोमवारी संध्याकाळी एका बहुमजली इमारतीच्या 13 व्या मजल्यावर भीषण आग लागली. ही आग विझविण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाचे 15 बंब पाठविण्यात आले. या दुर्घटनेत 9 जणांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये अग्निशमन दलाचे 4 कर्मचारी, दोन पोलीस कर्मचारी तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सामील आहे. आग लागण्यापूर्वी इमारतीत विस्फोट झाला होता.
घटनेनंतर तेथे पोहोचलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपण राजकारण करत नसलो तरीही रेल्वेने बचावासाठी इमारतीचा नकाशाच उपलब्ध केला नसल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मदतनिधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून या इमारतीत पूर्व आणि दक्षिणपूर्व रेल्वेची कार्यालये होती, अशी माहिती राज्यातील आपत्कालीन सेवा मंत्री सुजीत बोस यांनी दिली आहे. आग संध्याकाळी 6.10 वाजता लागली होती. कमी जागा असल्याने आग विझविण्यास मोठी अडचण झाल्याचे बोस यांनी सांगितले.