प्रतिनिधी /मडगाव
कोलमरड येथील राजकीय कार्यकर्ते नॅविन गोम्स व शिवानंद नाईक यांनी मडगावचे भाजपचे उमेदवार बाबू आजगावकर यांना पाठिंबा दिला आहे. आजगावकर यांच्या रूपात भाजपने मडगावला धडाडीचा उमेदवार दिला आहे. अनेक वर्षे उपेक्षित राहिलेल्या मडगावचा विकास करण्याची धमक आजगावकर यांच्यात असून मडगावात या खेपेस नक्कीच कमळ फुलणार आहे, असे गोम्स यांनी सांगितले.
गोव्याची आर्थिक राजधानी असलेल्या मडगाव शहराचा खरे तर स्मार्ट सिटी म्हणून विकास व्हायला हवा होता. पण, गेली 27 वर्षे मडगावच्या आमदाराने मडगावच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. पार्किंग, तुंबणारी गटारे यासारख्या समस्या अनेक वर्षांपासून मडगावकरांना भेडसावत आहेत. आना फॉन्त उद्यानाकडे दुर्लक्ष झाले आहे. या दुर्दशेला मडगावकर कंटाळले असून आजगावकर यांना निवडून आणून मडगावकर त्यांच्यामार्फत मडगावचा विकास करून घेणार आहेत, असे गोम्स यांनी सांगितले.
आजगावकर हे कार्यक्षम नेते असून मडगावात या खेपेस बदल निश्चित असल्याचे शिवानंद नाईक यांनी सांगितले. गोम्स हे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांचे कार्यकर्ते राहिलेले असून अनेक वर्षे ते कामत यांच्या सोबत होते. गोम्स व शिवानंद नाईक यांच्या पाठिंब्यामुळे कोलमरड तसेच मडगावच्या इतर भागांतही भाजपची ताकद वाढणार आहे, असे भाजपच्या मडगाव मंडळाचे सरचिटणीस सुनील नाईक यांनी सांगितले.