कँटीन कंत्राटदाराचे कृत्य : शॅडो कौन्सिलचा दावा
प्रतिनिधी /मडगाव
कोलमोरोड, मडगाव येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियमच्या बाहेर कचरा टाकणाऱयांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी शॅडो कौन्सिल फॉर मडगावने मडगाव पालिकेकडे केली आहे. इनडोअर स्टेडियमच्या कँटीन कंत्राटदाराने कोलमोरोडजवळच्या शेतात मोठय़ा प्रमाणात मिश्र कचरा टाकला आहे आणि जर तो त्वरित उचलल?ा गेला नाही, तर हे क्षेत्र निश्चितच मिनी सोनसडोमध्ये रूपांतरित होईल, असा दावा शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी केला आहे.
असे नाही की, या स्टेडियममध्ये पहिल्यांदाच अन्नासंदर्भात कचरा निर्माण होत आहे. लॉकडाऊन काळात हजारो अडकलेल्या स्थलांतरितांना येथे निवारा देऊन अन्न देण्यात आले. परंतु अशा प्रकारे कचरा उघडय़ावर फेकणे वा अन्य समस्या कधीच निर्माण झाल्या नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अशा प्रकारे कचरा उघडय़ावर टाकणे खपवून घेतले जाणार नाही. म्हणून आम्ही ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करतो. कचऱयाचे पृथक्करण करण्याचे निर्देश दिले जावेत, जेणेकरून विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेला कचरा वर्गीकृत पद्धतीने उचलता येईल, असे ते पुढे म्हणाले.
आम्ही सुरुवातीलाच हा मुद्दा उपस्थित करू इच्छितो. कारण एकदा येथे नियमित क्रीडा कार्यक्रम सुरू झाले की, नंतर निर्माण होणारी कचरा समस्या कोणाच्याही नियंत्रणापलीकडची असेल आणि अखेरीस आसपासच्या रहिवाशांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे शॅडो कौन्सिलने म्हटले आहे.