प्रतिनिधी /म्हापसा
कोलवाळ येथील सेंट्रल जेलमध्ये प्रशासकीय अधिकाऱयांनी घातलेल्या छाप्यात भ्रमणध्वनी, चार्जर, इअरफोन यासह तंबाखूजन्य पदार्थ, गांजा व रोकड आदी मिळून मोठा बेकायदेशीर साठा जप्त केला आहे. यामुळे कोलवाळ कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ऐन प्रजासत्ताक दिवशीच हा छापा घातल्याने येथील अधिकारी वर्गाची एकच धावपळ उडाली.
कारागृहातील ब्लॉक 1 मध्ये दोन भ्रमणध्वनी, गांजा, तंबाखू, चार्जर, इरअफोन तर ब्लॉक 2 मध्ये 17 भ्रमणध्वनी, चार्जर, दोन लाखांची रोकड, ब्लॉक तीनमध्ये 13 भ्रमणध्वनी, तसेच एनडीपीएस ब्लॉकमध्ये 7 भ्रमणध्वनी व गांजा, तंबाखू. ब्लॉक 4 मध्ये 4 भ्रमणध्वनी, रोख 36 हजार रुपये, गांजा, तंबाखू, क्वॉरंटाईन ब्लॉकमध्ये 9 भ्रमणध्वनी सापडले आहेत.
कोलवाळ कारागृहात मोठय़ा प्रमाणात अमलीपदार्थची देवाणघेवाण होत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱयांना मिळाल्यावर पोलिसांनी व प्रशासकीय अधिकारीवर्गाने काल बुधवारी छापा घातला. छापा पडल्यावर कैद्यांची व अधिकारीवर्गाची एकच धावपळ उडाली. नवीन वर्षातील ही मोठी कारवाई असून एवढय़ा मोठय़ा प्रमाणात येथे अमलीपदार्थ व भ्रमणध्वनी तसेच रोख रुपये आतमध्ये कसे जातात, हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर उपस्थित झाला आहे.