प्रतिनिधी /मडगाव
मडगावच्या जुन्या बाजारात कोलवा सर्कलजवळ काल सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एका इंडिका कारने पेट घेतला. कार चालक वेळीच कारमधून बाहेर पडल्याने कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. या दुर्घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली. कोलवा सर्कलजवळ कारने पेट घेण्याची ही दुसरी घटना ठरली.
गेल्या वर्षी कोलवा येथून मडगाव शहराकडे येणाऱया एका आलिशान कारने अशाच पद्धतीने पेट घेतला होता व कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. ती घटना दुपारच्यावेळी घडली होती. तर काल सोमवारी इंडिका कारने सायंकाळी पेट घेतला. कार पूर्णपणे जळून खाक झाली.
कारला आग नेमकी कशा प्रकारे लागली हे उशिरा पर्यंत स्पष्ट झाले नव्हते. मात्र, शॉर्टसक्रीटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मडगाव अग्नीशमन दलाने घटनास्थळी भेट देऊन आगीवर नियंत्रण मिळविले. ही कार गॅबी फर्नांडिस याच्या मालकीची होती अशी माहिती अग्नीशमन दलाने दिली.