प्रतिनिधी/ मडगाव
कोलवा येथील ‘मिनिनो जिझस’ म्हणजेच बालयेशूचा ‘फाम’ उत्सव आज सोमवार 12 रोजी साजरा करण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱया सोमवारी हा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा कोविडमुळे उत्सव मर्यादित स्वरूपात साजरा होणार असून भाविकांना चर्चमध्ये प्रवेश मिळणार नाही. यानिमित्त सकाळी 8 वा. प्रार्थनासभा होणार आहे. त्याचे सीसीआरटीव्ही, जीसीटीव्ही या दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून तसेच यू-टय़ुबवरून थेट प्रसारण होईल. भाविकांनी व पॅरिशनर्सनी हे थेट प्रक्षेपण पाहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रार्थनासभा झाल्यानंतर एरव्ही बालयेशूची प्रतिमा भाविकांच्या दर्शनासाठी आणि मूर्तीचे चुंबन घेण्यासाठी ठेवली जात होती. मात्र कोविडमुळे यंदा असे चुंबन घेता येणार नाही. तसेच आल्तारलाही भेट देता येणार नाही. चर्चच्या आवाराबाहेर प्रार्थनासभा घेतली जाणार नसून कॉन्प्रेरिया व पॅरिश कौन्सिलच्या निवडक सदस्यांना घेऊन ‘एसओपी’चे पालन केले जाईल, असे चर्चकडून कळविण्यात आले आहे. बालयेशूची प्रतिमा आल्तारवरून आणल्यानंतर माडी, खास कोरोनाच्या उच्चाटनासाठीही प्रार्थना व नंतर बालयेशूचे आशीर्वाद घेण्याचा कार्यक्रम होईल.
बालयेशू नवसाला पावतो अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळे ‘फाम’च्या दिवशी नवस फेडण्यासाठी एरव्ही गर्दी होत असे. शेजारील राज्यांतील भाविकही त्यास मोठय़ा संख्येने उपस्थिती लावत असत. त्याशिवाय शरीराच्या एखाद्या भागाला जुने दुखणे असल्यास त्यातून सुटकेसाठी बालयेशूला साकडे घालण्यात येते. सदर अवयव ठीक झाल्यावर त्याची मेणाची प्रतिकृती बालयेशूला अर्पण करण्यात येते. अशा प्रतिकृती अर्पण करण्यासाठीही गर्दी व्हायची. मात्र यंदा कोविडमुळे साऱयाच गोष्टींवर मर्यादा आल्या आहेत.