वृत्तसंस्था/ बुडापेस्ट
रशियाचा जलतरणपटू क्लिमेन्ट कोलेस्निकोव्ह हा 50 मी. बॅकस्ट्रोक शर्यत 24 सेकंदाच्या आत पूर्ण करणारा पहिला जलतरणपटू बनला असून येथे सुरू असलेल्या युरोपियन जलतरण चॅम्पियनशिपमध्ये त्याने सोमवारी या प्रकारात स्वतःचाच विक्रम मागे टाकत नवा विश्वविक्रम नोंदवला.
20 वर्षीय कोलेस्निकोव्हने उपांत्य फेरीत 23.93 सेकंदात शर्यत पूर्ण करताना यापूर्वीचा 24 सेकंदाचा विश्वविक्रम मागे टाकला. 2018 मध्ये ग्लासगो येथे झालेल्या युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये त्याने आधीचा विक्रम नोंदवला होता. त्या स्पर्धेत त्याने तीन सुवर्णपदके पटकावली होती. मात्र 50 मी. बॅकस्ट्रोक हा ऑलिम्पिकमधील क्रीडाप्रकार नसल्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जलतरणाचा हा प्रकार पहावयास मिळणार नाही.