मिनी लॉकडाऊनचा संडेही `शांतच’
प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरात विकेंड म्हटले की बाजारपेठेत, मॉल, मल्टीप्लेक्समध्ये गर्दी, वाहतुकीची कोंडी, खाऊ गल्ली, उद्याने हाऊसफुल्ल असतात, पण यावेळचा विकेंड त्याला अपवाद ठरला. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पुकारलेल्या विकेंड लॉकडाऊनला कोल्हापुरकरांनी शनिवारी, रविवारी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी `ब्रेक द चेन’ची घोषणा करत विकेंड लॉकडाऊन जाहीर केला. शनिवारी, रविवारी सलग दोन दिवस घरामध्ये थांबून कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी कोल्हापूरकरांनी योगदान दिले. शुक्रवारी रात्री सुरू झालेला विकेंड लॉकडाऊनमध्ये रस्ते, चौक, बाजारपेठेतील दुकाने कडकडीत बंद होती. शनिवारी, रविवारी हेच चित्र कायम राहिले. रविवारी सुट्टीमुळे नेहमी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी असते. या रविवारी मात्र, विकेंड लॉकडाऊनमुळे महाद्वार रोड, मिरजकर तिकटी, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शाहूपुरी येथे शांतता होती.
सार्वजनिक वाहतूक सेवेला फटका
प्रवाशांच्या सेवेसाठी रिक्षा, केएमटी व एस.टी उपलब्ध होती. मात्र, प्रवासी बाहेर न पडल्याने स्टॉपवर थांबून रहावे लागले. केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनी यातून प्रवास केला. दुसऱया दिवशीही लाखोंचा तोटा सहन करावा लागला.
सुरक्षा रक्षकांची जबाबदारीत वाढ
बँका, एटीएम सेंटर, हॉटेल, कापड दुकानांत खासगी सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली आहे. सलग दोन दिवस दुकाने बंद राहिल्याने सुरक्षा रक्षकावर जबाबदारी वाढली.
जनतेच्या प्रतिसादामुळे मिनी लॉकडाऊन यशस्वी
मिनी लॉकडाऊन शनिवार, रविवारी पाळला गेला. येथील मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची गर्दी नाममात्र होती, परजिल्हÎांतून एसटीतून प्रवासी येत होते. रिक्षा स्टॉपवर तुरळक रिक्षा होत्या. पण दुकाने बंद असल्याने परिसरात शांतता होती. दाभोळकर कॉर्नर, ताराराणी चौक, तावडे हॉटेल नाका, शिवाजी पूल, दसरा चौक येथेही पोलीस बंदोबस्त होता. सीपीआर हॉस्पिटलमध्ये परगावांतून आलेल्या वाहनांतील प्रवाशांची तपासणीसाठी गर्दी झाली होती. रविवार असूनही लक्ष्मीपुरीतील आठवडा बाजार बंद राहिल्याने शुकशुकाट होता. जनतेच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे विकएंड लॉकडाऊन यशस्वी झाला आहे.
लॉकडाऊन काळात पोलीस तपासणीत सापडलेल्या अनेकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. लॉकडाऊनमध्येही सुटीदिवशी सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला लाभार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. काही केंद्रंावर तर रांगा लागल्याचे दिसून आले. मिनी लॉकडाऊन असले तरी सलग लॉकडाऊनची भीती व्यक्त होत होती. रिक्षा बंद राहिल्याने अनेक प्रवाशांना घोडागाडीचा आधार घ्यावा लागल्याचे दिसून आले. पंचगंगा स्मशानभुमीत सकाळी लवकर कोरोना नियमावलीत रक्षा विसर्जन झाले. दुपारपर्यंत तीन कोरोना मृतदेहांवर गॅस दाहिनी अंत्यसंस्कार करण्यात आले. दशपिंडी घाटावरही शांतता दिसून आली.
लक्ष्मीपुरीतील आठवडी बाजाराला `ब्रेक’
रविवार म्हणजे खरेदीचा दिवस. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये दर रविवारी आठवडी बाजार भरतो. भाजीपासून धान्यापर्यंत ते कपडÎांची खरेदी आठवडी बाजारात होते. वर्षानुवर्षेच्या आठवडी बाजाराला यंदाही कोरोनामुळे `ब्रेक़’ लागला आहे. या ब्रेकमुळे शहरातील आठवडी बाजारामध्ये शांतता जाणवत आहे. आठवडी बाजारात होणारा गोंगाट पूर्णपणे थंडावल्याचे चित्र आहे.
शहरातील मोठा आठवडी बाजार म्हणजे लक्ष्मीपुरी. या बाजारामध्ये भाजी, पालेभाज्या, फळे, कपडे ते धान्याची खरेदी विक्री होते. मात्र दोन वर्षापासून आठवडी बाजाराला ब्रेक लागला आहे. पहिल्या वर्षी महापूर, गतवर्षी कोरोना तर यंदाही कोरोनाचे सावट असल्याने, आठवडी बाजार बंद राहिला आहे. बंदमुळे आर्थिक उलाढाल थांबली आहे. आठवडी बाजार आर्थिक उलाढालीचे मोठे केंद्र, पण कोरोनामुळे यंदाही आठवडी बाजार थांबला आहे.