कोल्हापूर/प्रतिनिधी
धावत्या केएमटी बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्रकार आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडला. बसच्या इंजिनमधून आगीचे लोट येऊ लागल्याने सर्वांची धावपळ उडाली. लक्ष्मीपुरी परिसरात ही घटना घडली. वेळीच प्रसंगावधान राखून नागरिकांनी ही घटना निदर्शनास आणल्यानंतर प्रवासी बाहेर पडले.त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सायंकाळची वेळ असल्याने 50 पेक्षा अधिक प्रवासी या बसमधून प्रवास करत होते.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, केएमटी (एम.एच.०९-सिव्ही-०४६४) ही प्रवासी बस कदमवाडीतून प्रवासी घेऊन पाचगावकडे निघाली असता लक्ष्मीपुरी परिसरात बसच्या दर्शनी भागात आग लागल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी तात्काळ ही केएमटी बस रोखली. सदर घटनेची कल्पना त्यांनी चालक आणि वाहकाला दिल्यानंतर धावपळ उडाली. सायंकाळची वेळ असल्याने 50 पेक्षा अधिक प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. वेळीच प्रसंगावधान राखून बसमधील प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. तसेच शेजारी असणार्या एका दुकानातून पाण्याची पाईप जोडून ही आग विझवण्यात आली. तसेच सदर घटनेची माहिती कोल्हापूर महानगरपालिका अग्निशामक दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत ही आग विझवण्याचे प्रयत्न केले. बस ची आग विझवल्या नंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मदतीला तत्पर बाळासाहेब खोत
या घटने प्रसंगी बाळासाहेब खोत यांनी चालक आणि वाहक यांच्या आग लागल्याचे निदर्शनास आणून दिले.त्यांनी तात्काळ दुकानातील बोरला पाण्याची पाईप जोडून ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे पन्नास प्रवाशांसह चालक वाहकांची देवदूत म्हणून खोत यांनी आपली जबाबदारी पार पाडली.