प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शनिवारी 713 वर पोहोचली. यामध्ये सकाळी आलेल्या अहवालामध्ये करवीर तालुक्यातील 2 तर सायंकाळी आलेल्या अहवालामध्ये कोमनपा हद्दीतील 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा समावेश आहे. तसेच जिल्हा आरोग्य विभागाला शनिवारी एकुण 214 अहवाल प्राप्त झाले असून यापैकी सुमारे 206 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी.केम्पीपाटील यांनी दिली.
21 ते 50 वर्षे वयोगटातील 470 कोरोना पॉझिटिव्ह
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या एकुण 713 वर पोहोचली आहे. यामध्ये अनुक्रमे वय वर्षे व रुग्ण संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे, 1 वर्षे – 1, 1 ते 10 वर्षे – 56, 11 ते 20 वर्षे – 87, 21 ते 50 वर्षे – 470, 51 ते 70 वर्षे – 93, 71 वर्षे व वरील – 6 रुग्णांचा कोरोना पॉझिटिव्हमध्ये समावेश आहे. आजअखेर 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून 616 रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात जिल्हा आरोग्य विभागाला यश मिळाले आहे. तर सध्या 89 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.
आज अखेर 616 रुग्णांना डिसचार्ज
जिल्हा आरोग्य विभागाने पुरविलेल्या चांगल्या वैद्यकीय सेवेमुळे आजअखेर जिल्हयातील सुमारे 616 रुग्णांना डिसचार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक 176 रुग्ण तर सर्वात कमी 6 रुग्ण गगनबावडा तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात करवीरमध्ये दोन रुग्ण आढळले असून एकुण रुग्णसंख्या 21 वर तर कोमनपा हद्दीत एक रुग्ण आढळला असून एकुण रुग्णसंख्या 26 वर पोहोचली आहे.
दिवसभरात 206 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह
जिल्हा आरोग्य विभागाला शनिवारी दिवसभरात एकुण 214 स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी सुमारे 206 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 5 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले. यामुळे जिल्हयातील एकुण रुग्णसंख्या 713 वर पोहोचली.