प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन कोल्हापुरात 50 वर्षांपुढील सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज याबद्दल माहिती दिली.
कोल्हापूर जिल्हयामध्ये ५० वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना मधुमेह, रक्तदाब, हृदय विकार, दमा, क्षय रोग तसेच इतर श्वसनाचे विकार असणाऱ्या व्यक्तींमध्ये कोव्हिड १९ विषाणू प्रतिबंधक प्रतिकारशक्ती व सर्वसाधारण रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाययाजना हाती घेण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील 50 वर्षापेक्षा जास्त असलेल्या व विविध व्याधीग्रस्त नागरिकांमध्ये कोविड-19 विषाणू प्रतिबंधक रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपाय योजना सुचविण्याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज आयुष समिती स्थापन केली. या समितीने उपाय योजनांबाबत येत्या दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.