ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ऑनलाइन विक्री प्रारंभ
प्रतिनिधी / कोल्हापूर
देशभर लौकिक असलेले कोल्हापुरी चप्पल आता ॲमेझॉन या डिजिटल बाजारपेठ विक्री संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे. त्यामुळे कोल्हापुरी चप्पलने जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वेबसाईट उघडून हा ऑनलाईन विक्री प्रारंभ झाला.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत उमेद -महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांचे जीवनमान उंचावणे, हा या अभियानाचा मुख्य उददेश आहे. कोल्हापूर जिल्हयामध्ये १२,१०० इतक्या स्वयंसहाय्यता गटांची स्थापना करणेत आलेली आहे. तसेच २६० ग्रामसंघ व दोन प्रभाग संघाची स्थापना करणेत आलेली आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास व जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन पानारी आदी उपस्थित होते.
जगात भारी… कोल्हापुरी… ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जगात भारी… कोल्हापुरी … असा कोल्हापूर जिल्ह्याचा लौकिक सर्वदूर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या शेतीमालासह औद्योगिक व महिला बचत गटांच्या उत्पादनांनाही दर्जा व गुणवत्तेमुळे बाजारपेठेत मोठी मागणी आहे. अमेझॉनसारख्या डिजिटल बाजारपेठ विक्री संकेतस्थळामुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळून त्यांचे सक्षमीकरण होईल.