सातारा / प्रतिनिधी :
महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या साताऱ्यातील 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये चित्तथरारक लढतीत कोल्हापूरचा पै. पृथ्वीराज पाटील याने मुंबईचा पै. विशाल बनकर याच्यावर 5-4 अशी मात करत महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली. अंतिम कुस्ती पाहण्यासाठी छत्रपती शाहू क्रीडा संकुलात हजारो कुस्ती प्रेमी उपस्थित होते.
महाराष्ट्र केसरीसाठी माती विभागातून सोलापूरचा मुंबईकडून खेळणारा विशाल बनकर आणि गादी गटातून कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील यांची लढत झाली. या लढतीत विशालने प्रथम पृथ्वीराजवर 4 गुणांनी आघाडी घेतली होती. मात्र शेवटी त्याने ही पिछाडी भरून काढत 5-4असा विजय मिळवला. अतिशय थरारक आणि काळजाचा ठोका चुकविणारी कुस्ती पाहायला मिळाली. प्रेक्षकांनी दोन्ही मल्लांना पाठिंबा दिला.हजारो प्रेक्षकांची उपस्थिती होती. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील व मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा देण्यात आली.