शेवटच्या 12 सेकंदाने फिरवला निकाल, मुंबईचा विशाल बनकर उपमहाराष्ट्र केसरी
दीपक प्रभावळकर-फिरोज मुलाणी/ सातारा
शनिवारी सायंकाळी 7.00 वाजता 64 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत सुरु झाली. लाल जर्सी परिधान केलेला पृथ्वीराज पाटील आणि निळय़ा जर्सीतील विशाल बनकर परस्परांशी भिडले. भरपूर उंची लाभलेला विशाल आणि मजबूत बांध्याचा पृथ्वीराज याने सलामीपासूनच आक्रमणावर भर दिली. विशाल नकारात्मक कुस्ती करत असल्याबद्दल पंचांनी समज देऊन गुण घेण्याची समज दिली. याच संधीचा फायदा घेत काखेत हात घालून साईड सालतो डावावर 4 गुणाने आपले खाते उघडून पृथ्वीराजवर दबाव वाढवला. पृथ्वीराजने विशाल बाहेर ढकलून 1 गुण वसूल करुन आपले इरादे स्पष्ट केले. गुणांची पिछाडी भरुन काढण्यासाठी वारंवार आक्रमण करुनही विशालचा बचाव भेदण्यात पृथ्वीराजला अपयश आले.
पहिल्या फेरीत बढत घेऊन विशालने पृथ्वीराजवरील दबाव वाढवला. मात्र निर्णायक फेरीत दबाव झुगारुन पृथ्वीराजने गिअर बदलला. एकेरी पटाची पकड करुन 2 गुण वसूल केले. त्यानंतर आक्रमक झालेल्या विशालने हप्ते भरण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरवत आणखी 2 गुणांची कमाई करुन आघाडी घेतली. ही आघाडी मोडून काढण्यासाठी अंतिम क्षणापर्यंत झुंज देणाऱया बनकरचे विशाल प्रयत्न पृथ्वीराजने हाणून पाडले. महाराष्ट्र केसरी किताबाची प्रतिष्ठेची लढत खिशात टाकून दोन दशकानंतर कोल्हापूर कुस्तीपंढरीचे महाराष्ट्र केसरी गदेचे स्वप्न साकार केले.
आज सकाळच्या सत्रात माती आणि गादी गटातील अंतिम लढतीतून मूळचा सोलापूरचा विशाल बनकर आणि कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी लढतीत अंतिम फेरीत पोहोचले. गदा कोल्हापूर का सोलापूरला जाणार हे निश्चित झाल्यानंतर दुपारपासूनच सोलापूर आणि कोल्हापूरच्या कुस्तीशौकिनांचे लोंढेच्या लोंढे सातारच्या दिशेने वाहू लागले होते. अंतिम लढतीसाठी छत्रपती शाहू स्टेडियम कुस्तीशौकिनांच्या गर्दीने फुलून गेले होते. सळसळता उत्साह आणि उसळलेल्या हजारो जनसागराच्या साक्षीने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पहिल्यांदाच उतरलेल्या पृथ्वीराजने पहिल्या फेरीपासून सुरू केलेली विजयी घोडदौड अंतिम फेरीतही कायम ठेवली.
नवीन असूनदेखील अनुभवी उमद्या मल्लांना पराभवाचा धक्का देणारे नव्या दमाचा पृथ्वीराज सुरुवातीपासूनच कुस्तीशौकिनांच्या नजरेत डार्कहॉर्स बनला होता. अंतिम फेरीतही आपली सर्वोत्तम कामगिरी करत कोल्हापूरकरांच्या अपेक्षा पूर्ण केल्या. विशाल देवठाणे (ता. पन्हाळा) येथील असून त्याच्या घरात कुस्तीची मोठी परंपरा आहे. ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत सुवर्णपदक, ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियन पदक, कास्य आणि वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत रजत पदक पटकावले आहे. तसेच गतवेळच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत 92 किलो गटात त्याला सुवर्ण पदक मिळाले होते. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव त्याच्या पाठीशी आहे. चुलते उपमहाराष्ट्र केसरी संग्राम पाटील, जालिंदर आबा मुंडे, रामचंद्र पवार, अमर निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करत आहे.
अंतिम फेरीत धडक मारलेला विशाल बनकर हा मूळचा सोलापूर जिल्हय़ातील सदाशिवनगरचा मल्ल आहे. आजोबांपासून त्याच्या घरात कुस्तीची मोठी परंपरा आहे. वडिल शिवाजी बनकर आणि चुलते महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर यांचा त्याला वारसा आहे. वयाच्या 16 व्या वर्षी खवसपूर येथे भारत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीची सुरुवात केली. सध्या तो कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत विश्वास हरगुले यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचा सराव करत आहे. 2018-19 साली महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत 97 किलो माती गटात सुवर्णपदक पटकावल्याने पटाला लागताच टांग मारणे हे त्याच्या खेळाचे वैशिष्टय़ आहे. महाराष्ट्र केसरीची गदा जिंकण्याचे विशालची मात्रा पृथ्वीराज पुढे चालली नसल्याने त्याला उपमहाराष्ट्र केसरी पदावर समाधान मानावे लागले.
विशालला मानाची महाराष्ट्र केसरी पदाची गदा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते देण्यात आली. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, तालिम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार, खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, महाबली सत्पाल, परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, आमदार राम सातपुते, आमदार दीपक चव्हाण, शिवसेना नेते नितीन बानुगडे-पाटील, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख धवलसिंह मोहिते पाटील, हिंदकेसरी दिनानाथ सिंह, अर्जुनराव काका पवार, अर्जुनवीर राहुल आवारे, जागतिक पदक विजेता नरसिंग यादव, हिंदकेसरी योगेश दोडके, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, अभिनेत्री दिपाली सय्यद, पुरुषोत्तम जाधव, संयोजक जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, सुधीर पवार, संदीप मांडवे आदी उपस्थित होते.