कोल्हापूर प्रतिनिधी
लाहौल (हिमाचल प्रदेश) येथील ट्रान्स हिमालय किंगडममध्ये 26 मार्च रोजी राष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या पहिल्या वहिल्या स्नो-मॅरेथॉन स्पर्धेसाठी कोल्हापूरचा धावपटू विशाल गुडूळकर याला ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून निवडण्यात आले आहे. 2018 साली गरवाल (डेहराडून) येथे झालेल्या अल्ट्रा रनमध्ये आणि 2019 साली हैदराबादेत झालेल्या स्टेडियम रनमध्ये विशालने दमदार धाव करुन वेगळा ठसा उमटवला होता. त्याचीच दखल घेऊन स्नो-मॅरेथॉन स्पर्धा आयोजक रिच इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने (लाहौल) विशालची ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून निवड केली. या संदर्भातील अधिकृत पत्र नुकतेच कंपनीकडून विशालला देण्यात आले आहे.
विशाल हा स्पर्धेचा फक्त ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून म्हणून मिरवणार नसून खुल्या गटाअंतर्गत होणाऱया 42 किलो मीटर स्नो-मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. विशाल सोबत स्पर्धेत देशभरातून सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना या मॅरेथॉनमध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बर्फाळ भागातूनच धावावे लागणार आहे. शिवाय त्यांना उणे 18 अंश अशा धोकादायक वातावरणातून धाव घेताना आपल्यातील कस लावावा लागणार आहे. मधेमधे भासणाऱया ऑक्सिजनच्या कमतरतेलाही त्यांना धैर्याने तोंड द्यावे लागेल. अशा या खडतर स्पर्धेतील विजेत्या धावपटूंना आकर्षक बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे. विशाल हा रुईकर कॉलनीत वास्तव्य करत आहे. आजवर त्याने तीनहून अधिक राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे नियोजित 42 किलो मीटरचे आंतर कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचा पराक्रम केला. तसेच त्याने दोन अल्ट्रा रनर या स्पर्धेचे नियोजित 75 किलो मीटरचे आंतर 12 पैकी अकरा तासांत पूर्ण करुन स्पर्धा आयोजकांची मने जिंकली आहेत. वैशिष्ठय़ म्हणजे विशाल हा स्पर्धांचा सराव विना प्रशिक्षक पण शास्त्रोक्त पद्धतीने करत असतो. तो सध्या फिटनेस इन्स्ट्रक्टर म्हणून कार्यरत आहेत.