देवगड शहरातील लॉजवरील घटना
प्रतिनिधी / देवगड:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील एका लॉजवर क्वारंटाईन करण्यात आलेल्या कोल्हापूरमधील एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. रणजित सुनील घाडीवट्टार-मोहिते (22) असे या युवकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजित हा देवगड-वाडातर येथील आनंद ढोके यांच्या बागेत गेले वर्षभर व्यवस्थापक म्हणून कामाला होता. 21 जून रोजी तो कोल्हापूर येथील आपल्या घरी परतला. कोल्हापूर येथून पुन्हा देवगड येथे आल्यानंतर त्याला शहरातील एका लॉजवर क्वारंटाईन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लॉजच्या रुममधून त्याचा प्रतिसाद न आल्याने लॉज मालकाने आनंद ढोके यांच्याशी संपर्क साधला. ढोके हे तात्काळ लॉजकडे दाखल झाले. त्यांनी रणजितच्या रुमच्या खिडकीच्या एका फटीतून आत पाहिले असता रणजितचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत दिसला. त्यानंतर रुमचा दरवाजा तोडण्यात आला. रणजितने छताच्या हुकाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनेची खबर लॉज मालकाने देवगड पोलिसांत दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. डी. कांबळे करीत आहेत.