प्रतिनिधी / कोल्हापूर :
वाऱयाच्या वेगाने चारचाकी गाडी चालवतानाच देशातील प्रसिद्ध रेसरांना मागे टाकत कोल्हापूरच्या ध्रुव मोहिते या रेसरने नॅशनल एफएमएससीआय नॅशनल रेसिंग चॅम्पियनशीप स्पर्धेचे सलग चौथ्यांदा जेतेपद पटकावले. जेतेपदाला गवसणी घालण्यासाठी ध्रुवने दोन रेसमध्ये पहिला, एका रेसमध्ये दुसरा तर आणखी दोन रेसमध्ये तिसरा क्रमांक पटकावला. एमआरएफ कंपनी आणि चैन्नई येथील मद्रास मोटर रेस ट्रकच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चैन्नईतील मद्रास मोटर रेस ट्रकवर ही स्पर्धा होती. या स्पर्धेत वेगवान कामगिरी करत चैन्नईच्या अर्जुन बालूने दुसरा आणि गोव्याच्या किथ डिसोझाने तिसरा क्रमांक मिळवला.
3 फेऱ्या आणि 8 रेस असे स्पर्धेचे स्वरूप असलेल्या नॅशनल रेसिंग चॅम्पियनशीप स्पर्धेला फेब्रुवारी 2019 मध्ये प्रारंभ झाला होता. स्पर्धेसाठी 3.2 किलो मीटरचा ट्रक नियोजित होता. इंडियन टुरींग कार या प्रकारातून 22 वर्षीय ध्रुव मोहितेने हा पोलो आयटीसी या चारचाकी गाडीद्वारे एफबी मोटर स्पोर्टस् फोक्सव्हॅगन या संघातर्फे स्पर्धेत सहभाग घेतला होता. मात्र स्पर्धेच्या पहिल्याच फेरीवेळी भारतात कोरोनाची शिरकाव झाला. त्यामुळे ध्रुवने आरोग्याला प्राधान्य देत संसर्ग टाळण्यासाठी पहिल्या फेरीतील दोन्ही रेसमध्ये सहभाग घेतला नाही. दुदैवाने देशात कोरोना संसर्ग वाढतच गेल्याने पुढील 8 महिने स्पर्धेची दुसरी व तिसरी स्थगित करावी लागली. ऑक्टोबरपासून मात्र कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे स्पर्धा आयोजकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यकती खबरदारी घेत गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या फेरीचे आयोजन केले. या फेरीत ध्रुव पुर्ण तयारीनिशी उतरला. त्याने फेरीच्या पहिल्या रेसमध्ये तिसरा आणि दुसऱ्या रेसमध्ये दुसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे जेतेपद मिळवायचे असेल तर आता 28 व 29 नोव्हेंबरच्या तिसऱया फेरीतील तिन्ही रेसमध्ये ध्रुवला मोठी कामगिरी करणे आवश्यक होते. ध्रुवनेही स्पर्धेचे जेतेपद मिळवाचेच असा मनोदय करूनच रेसमध्ये सहभागी होण्याची तयारी केली होती. मात्र 28 तारखेला मोठा पाऊस झाल्याने तिन्ही रेसमध्ये 29 ला होतील, असे स्पर्धा आयोजकांनी घोषित केले. त्यानुसार तिन्ही रेस 29 ला झाल्या. यापैकी पहिल्याच रेसमध्ये ध्रुवला तिसऱया क्रमांकावर समाधान मानाने लागले होते. मात्र मनाचे खच्चीकरण न होऊ देता, त्याने दुसऱया आणि तिसऱया फेरीत वाऱयाच्या वेगाने गाडी चालवत पहिला क्रमांक पटकावला. याच कामगिरीमुळे ध्रुवचा नॅशनल एफएमएससीआय नॅशनल रेसिंग चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब झाला. बक्षीस वितरण समारंभात त्याला फोक्सव्हॅगन इंडियाचे प्रमुख शिरीष विसा यांच्या उपस्थितीत मानाचे चषक देऊन गौरविण्यात आले.