प्रतिनिधी / बेळगाव
सावगाव येथे धुलिवंदनानिमित्त जय हनुमान कुस्ती संघटनेने आयोजित केलेल्या भव्य कुस्ती मैदानात कोल्हापूरच्या सिकंदर शेखने दिल्लीच्या प्रवीण कुमारला अवघ्या दोनच मिनिटात निकाल टाकून लाटणे डावावर प्रेक्षणीय विजय मिळवित उपस्थित 25 हजारांहून अधिक कुस्तीशौकिनांची मने जिंकली.
सायंकाळी 9 वा. भारत केसरी प्रवीण कुमार दिल्ली व महान भारत केसरी सिकंदर शेख यांची प्रमुख कुस्ती लोकमान्य सोसायटीचे डायरेक्टर गजानन धामणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर. एम. चौगुले, कुस्तीचे आश्रयदाते सतीश पाटील, कृष्णा चौगुले, सी. एम. पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. प्रारंभी सिकंदर व प्रवीण कुमार यांनी ताकद आजमावल्यानंतर दुसऱयाच मिनिटाला सिकंदर शेखने एकेरी पट काढून प्रवीण कुमारला खाली घेतले आणि निकालावर चित करण्याचा प्रयत्न करत असताना खाली बसून लाटणे डावावर अस्मान दाखवित कुस्ती शौकिनांची मने जिंकली.
उदय खांडेकर पुणे व संगमेश बिरादार, मठपती आखाडा ही दुसऱया क्रमांकाची कुस्ती निंगाप्पा मोरे, आर. आय. पाटील, सुधीर चव्हाण, सुरेश डुकरे, आप्पा जाधव, कृष्णा उंदरे, सचिन गोरले, मनोहर बेळगावकर, सुनील अष्टेकर आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत चौथ्या मिनिटाला उदय खांडेकरने संगमेशला दुहेरी पट काढत खाली घेऊन फिरवण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून संगमेशने सुटका करून घेतली. दहाव्या मिनिटाला संगमेशने चाट मारून उदयला खाली घेत घुटण्यावर फिरवण्याचा प्रयत्न केला. पण जबरदस्त ताकदीच्या उदयने त्यातून सुटका करून घेतली. 22 मिनिटानंतर ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.
तिसऱया कुस्तीत शिवया पुजारी- मठपती आखाडा याने मंदार वावले- पुणे याला सातव्या मिनिटाला एकेरी पट डावावर चित केले. चौथ्या क्रमांकाची रोहीत कंग्राळी व आदी शिंदे, पुणे ही कुस्ती डाव प्रतिडावाने रंगली, पण वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आली. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत विक्रम शिनोळीने पवन चिकदीनकोपचा निकाली डावावर पराभव केला. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत सुशांत कंग्राळीने सोनू तनपुरे, पुणे याचा झोळी डावावर पराभव केला. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत राम दाहीगुळे, पुणे याने महादेव दऱयाण्णवर याचा आतील टांगेवर पराभव केला. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत आकाश घाडी, एमईजी बेंगळूर याने निलेश खताळ, पुणे याचा घिस्सा डावावर पराभव केला. दहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत विजय चिम्मड, भांदूर गल्ली याने संकल्प कंग्राळीवर एकलांगी डावावर विजय मिळविला. त्याचप्रमाणे शुभम कंग्राळी, प्रवीण निलजी, शुभम कंग्राळी, रुपेश कर्ले, नंदेश इटगी, महांतेश तीर्थकुंडये, यशपाल राजस्थान, सुरज कडोली, कुबेर पिरनवाडी, शंकर तीर्थकुंडये, ओम कंग्राळी, प्रथमेश कंग्राळी, किसन कंग्राळी, तुकाराम भांदूर गल्ली, वैभव सांबरा, उत्कर्ष बोडक्यानहट्टी, गणेश फडके कडोली, महांतेश संतीबस्तवाड, संभाजी धुंदरे राशिवडे, श्रीघाडी, स्वप्नील सावगाव, केशव मोदगा या मल्लांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.
आकर्षक कुस्तीमध्ये ओमकार शिंदे राशिवडेने विनय गुरव याचा निकाली डावावर पराभव केला. मेंढय़ाच्या कुस्तीत ओंकार सावगावने दयानंद शिरोड याचा आकडी डावावर पराभव करून मेंढय़ाचे बक्षीस पटकाविले. पार्थ कंग्राळीने ज्ञानेश्वर भांदूर गल्ली याचा घिस्सा डावावर पराभव केला. आखाडय़ाचे पंच म्हणून रत्नकुमार मठपती, रुपेश पाटील, ए. जी. मणतुर्गी, बाळाराम पाटील, कृष्णा पाटील, सुधीर बिर्जे, विश्वनाथ पाटील आदींनी काम पाहिले. प्रारंभी आखाडय़ाचे पूजन शिवाजी सुंठकर यांनी केले. कुस्तीचे समालोचन कृष्णा चौगुले राशिवडे यांनी केले. हलगीवादन हणमंत कोल्हापूर व सहकाऱयांनी केले.