प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील कर कमी केल्यानंतर राज्य सरकारनेही करात कपात केली. त्यामुळे पेट्रोल 13.30 रुपये तर डिझेल 19.47 रुपयांनी कमी झाले. परिणामी शेजारील कोल्हापूर जिल्हय़ापेक्षा बेळगावमध्ये 9 रुपयांनी पेट्रोल तर 8 रुपयांनी डिझेल स्वस्त झाले आहे. यामुळे बेळगाव जिल्हय़ाच्या सीमेवरील पेट्रोलपंपांवर वाहनांची गर्दी होऊ लागली आहे. परंतु याचा फटका कोल्हापूर जिल्हय़ातील पेट्रोलपंप चालकांना बसत आहे.
पेट्रोल व डिझेलचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत होते. देशातील इतिहासात पहिल्यांदाच इंधनाचे दर हे शंभरी पार करून पुढे जात होते. त्यामुळे वाहनचालक मेटाकुटीला आले होते. डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्चही वाढला होता. त्यामुळे हे दर केव्हा कमी होणार याची प्रतीक्षा वाहनचालकांना होती. अखेर दिवाळीत केंद्र सरकारने करामध्ये कपात करत इंधनाचे दर कमी केले. त्यापाठोपाठ राज्य सरकारनेही कपात करत इंधनाचे दर कमी केले. त्यामुळे वाहनचालकांमधून काही प्रमाणात का होईना समाधान व्यक्त होत आहे.
बेळगुंदीपासून कागवाडपर्यंत महाराष्ट्राच्या सीमेला लागून अनेक पेट्रोलपंप आहेत. पेट्रोल व डिझेलचे दर बेळगावमध्ये स्वस्त असल्याने ट्रक्टर, ट्रक, कंटेनर, लॉरी, तसेच चारचाकी वाहने इंधन भरण्यासाठी दाखल होत आहेत. प्रत्येक लिटरमागे 8 ते 9 रुपयांची बचत होत असल्याने मिळेल तितके पेट्रोल-डिझेल कोल्हापूर येथील ग्राहक खरेदी करून घेऊन जातात. यामुळे पेट्रोलपंपांवरील विक्री कमालीची वाढली आहे. परंतु सीमेच्या पलीकडे असणाऱया पेट्रोलपंपांवरील विक्री कमी झाल्याचे दिसत आहे.
कोल्हापूर जिल्हय़ातील पंपचालकांना फटका
बेळगाव जिल्हय़ाच्या सीमेलगत असणाऱया पेट्रोलपंप चालकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. इंधन भरण्यासाठी वाहने बेळगाव जिल्हय़ातील पेट्रोलपंपांवर दाखल होत आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्हय़ातील पेट्रोलपंप चालकांना आर्थिक फटका बसत आहे. मागील दोन दिवसांत विक्रीमध्ये याचा फरक जाणवत आहे. चंदगडपासून म्हैशाळपर्यंत महाराष्ट्रातील पेट्रोलपंपांवर शुकशुकाट जाणवत आहे.
चंदगड तालुक्मयात सर्वाधिक इंधनाचे दर
कोल्हापूर जिल्हय़ाला येणारे इंधन हे मिरज येथून वितरित केले जाते. त्यामुळे मिरजपासून चंदगडपर्यंत ट्रक येईपर्यंत लागणारा वाहतूक खर्च हा इंधनाच्या दरामध्ये समाविष्ट केला जातो. त्यामुळे चंदगड येथे पेट्रोलचा दर 111.40 रुपये तर डिझेलचा दर 94 रुपये इतका होता. कोल्हापूर जिल्हय़ात सर्वाधिक इंधन दर चंदगड तालुक्मयात असल्याचे सांगण्यात आले.
दोन दिवसांमध्ये डिझेलची विक्री वाढली
-प्रशांत मेलगे (सदस्य-बेळगाव जिल्हा पेट्रोलपंप चालक असोसिएशन)
केंद्र व राज्य सरकारने इंधनावरील कर कपात केल्याने इंधनाचे दर कमी झाले. मागील दोन दिवसांमध्ये डिझेलची विक्री वाढली आहे. आमचा पेट्रोलपंप पुणे- बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर असल्याने महाराष्ट्रातून वाहने बेळगावमध्ये डिझेल व पेट्रोल भरत आहेत. सीमावर्ती भागात वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याचे प्रशांत मेलगे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री-अर्थमंत्र्यांना भेटणार
-गजकुमार माणगावे (अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्रोल असोसिएशन)
कर्नाटक राज्य सरकारने इंधनावरील कर कमी केला. परंतु अद्याप महाराष्ट्र सरकारने कर कमी केलेला नाही. याचा फटका बेळगाव व कोल्हापूर जिल्हय़ाच्या सीमावर्ती भागात असणाऱया 70 ते 80 पेट्रोलपंपांना बसत आहे. दोन दिवसांत विक्री पूर्णपणे ठप्प झाली असून राज्य सरकारचा महसूलही बुडत आहे. त्यामुळे सोमवारी असोसिएशनचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांना भेटणार असल्याचे गजकुमार माणगावे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.